Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनू दासने केली कमाल, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत मारली मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 09:35 AM2021-07-29T09:35:01+5:302021-07-29T09:42:28+5:30
Tokyo Olympics Live Updates, Atanu Das: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला ने पराभूत केले.
टोकियो - भारताचा आघाडीचा तिरंदाज अतनू दास याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत धडाकेबाज कामगिरी करत तिरंदाजीमधील कोरियन वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला शूट ऑफमध्ये ६-५ ने पराभूत केले. या विजयासह अतनू दास (Atanu Das) याने पुरुष एकेरीमधील अंतिम १६ खेळाडूंमध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. (Archer Atanu Das beats South Korea's Oh Jin-Hyek 6-5 in men's individual 1/16 eliminations)
या लढतीत पहिला सेट २६-२५ ने गमावल्यानंतर अतनू दासने जबरदस्त पुनरागमन केले आहे. दोन्ही खेळाडूंमधील दुसरा आणि तिसरा सेट २७-२७ अशा बरोबरीत सुटला. तर चौथ्या सेटमध्ये अतनू याने बाजी मारत हा सेट २७-२२ ने जिंकला. त्यानंत पाचवा सेटही २८-२८ ने बरोबरीत सुटला. त्यानंतर हा सामना शूट ऑफमध्ये गेला. त्यामध्ये ओ जिन्होक याने ९ स्कोअर केला. तर अतनू याने परफेक्ट १० चा निशाणा साधत हा सामना जिंकला.
Tokyo Olympics | Archer Atanu Das beats South Korea's Oh Jin-Hyek 6-5 in men's individual 1/16 eliminations
— ANI (@ANI) July 29, 2021
दरम्यान, तत्पूर्वी टॉप ३२ फेरीत अतनू दास याने तैवानच्या डेंग यू चेंग याचा ६-४ ने पराभव केला होता. अतनू याने हा सामना २७-२६, २७-२८, २८-२६, २७-२८ आणि २८-२६ अशा फरकाने जिंकला. डेंग हा यंदाच्या ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या सांघिक गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघातील नेमबाज आहे. मात्र त्याचा दबाव न येऊ देता अतनू याने त्याचे आव्हान परतवून लावले.
बॉक्सिंगमध्ये सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत
भारतीय बॉक्सरनी टोकियोमध्ये विजयी आगेकूच कायम राखली आहे. पुरुषांच्या ९१ किलो हेविवेट वजनी गटात भारतीय बॉक्सर सतीश कुमार याने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनवर ४-१ ने विजय मिळवला. टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा भारताचा तो तिसरा बॉक्सर ठरला आहे. याआधी एमसी मेरीकोम आणि पूजा राणी यांनी महिलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता हे बॉक्सर पदकापासून केवळ एक विजय दूर आहेत.