Tokyo Olympics: तिरंदाज प्रवीण जाधव याच्या घरावर जेसीबी फिरवण्याची धमकी; घरच्यांची गाव सोडण्याची तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 03:18 PM2021-08-08T15:18:39+5:302021-08-08T15:20:12+5:30
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघातील सदस्य प्रवीण जाधव हा देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याच्या गावातील शेजाऱ्यांकडून धमकी मिळत आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघातील सदस्य प्रवीण जाधव हा देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याच्या गावातील शेजाऱ्यांकडून धमकी मिळत आहे. त्याचं घर जेसीबी पाडण्याची धमकी शेजाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. प्रवीणचे वडील रमेश या वादाला एवढे कंटाळले आहेत की, त्यांनी हा वाद असाच सुरू राहिला तर गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. ( Archer Jadhav's parents say land dispute may force them to leave village)
प्रवीणचे आई-वडील, काका आणि चुलत भाऊ सातारा जिल्ह्यातील सरडे गावात राहतात. येथे त्यांचा दोन खोलींचं छोटंस घर आहे. प्रवीणचे वडील गावात मजूरी करतात. प्रवीण भारतीय सैन्यात काम करत असल्यानं घराची परिस्थिती सुधारली आहे. अशाच प्रवीणच्या वडिलांना घराचं काम करायचं आहे, परंतु शेजारी त्यांना बांधकाम करण्यास देत नाही. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही त्यांची जागा आहे. प्रवीणच्या कुटुंबीयांनी घर मोठं बांधल्यास रस्ता आणखी छोटा होईल, असा त्यांचा दावा आहे. पण प्रवीणच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
प्रवीणचे म्हणणे काय?
हरियाणा येथे सराव करीत असलेल्या प्रवीण जाधव यांनी तेथे पत्रकारांना दिलेल्या माहितीत सांगितले, की सरडे (ता. फलटण) गावातील एका कुटुंबातील पाच ते सहा लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी आई-वडील व काका-काकूंना धमकावण्यास सुरुवात केली. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार असल्याने त्यांनी आम्हाला विरोध दर्शविला आहे. माझ्या कुटुंबीयांना खूप त्रास होत असून मी तिथे त्यांच्या सोबत नाही. याबाबत मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललोय.
जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य झोपडीत राहत होते. मात्र, प्रवीण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले आहे. याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. शेजाऱ्यांना घरापुढून एक वेगळा मार्ग हवाय. त्यावर त्यांना प्रवीणच्या कुटुंबीयांनी होकारही दिला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा धमकावण्यास सुरुवात केलीय. याप्रकरणी कुटुंबीयांनी सातारा जिल्ह्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते.
ऑलिम्पिकमधून परतल्यावर भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेले असून तिथे ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत.