Tokyo Olympics: बजरंगाची कमाल, कांस्य धमाल; कजाकिस्तानच्या नियाजबेकोवला केले पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:17 AM2021-08-08T05:17:27+5:302021-08-08T05:17:58+5:30
Tokyo Olympics: भारताला रवी आणि बजरंग यांच्या पदकांनी दिलासा मिळाला आहे. कारण कुस्तीपटूंकडून जास्त पदकांची अपेक्षा होती.
चीबा, जापान : भारतीय पहेलवान बजरंग पुनियाने शनिवारी येथे कजाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव याला ८-० ने पराभूत करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत ६५ किलो गटात कांस्य पदक मिळवले. भारताने या पदकासोबतच आपल्या ऑलिम्पिक सर्वश्रेष्ठ कामगिरीची बरोबरी केली आहे. भारताचे या स्पर्धेतील हे सहावे आणि कुस्तीतील दुसरे पदक आहे. यात रवी दहिया याने ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. भारताने या आधी लंडन ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि कांस्य मिळले होते.
भारताला रवी आणि बजरंग यांच्या पदकांनी दिलासा मिळाला आहे. कारण कुस्तीपटूंकडून जास्त पदकांची अपेक्षा होती. पदकाची प्रबळ दावेदार विनेश फोगाट ही क्वार्टर फायनलच्या पुढे जाऊ शकली नाही.उपांत्य फेरीत हाजी अलीव विरोधात बजरंग पुनियाला पराभव पत्करावा लागला. मात्र शनिवारी त्याने बचाव आणि आक्रमण यांचा योग्य समतोल साधला आणि विजय मिळवला. नियाजबेकोव यानेच २०१९ विश्व चॅम्पियनशीपमध्ये बजरंगला पराभूत केले होते. शनिवारी बजरंगचा नूर काही वेगळाच होता. त्याला पहिला गुण नियाजबेकोवच्या निष्क्रीयतेमुळे मिळाला. भारतीय पहेलवानाने डाव्या पायावर आक्रमण केले. पहिल्या पिरीयडमध्ये त्याने २ -० अशी आघाडी घेतली. त्याने वारंवार आक्रमण कायम ठेवले. त्यामुळे त्याला लवकरच ६-० अशी आघाडी मिळाली. नियाजबेकोव हा रेपशॉज राऊंड जिंकून कांस्य पदकाच्या लढाईत पोहचला होता.