टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेतच होईल - आयओए

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:26 AM2020-03-20T05:26:54+5:302020-03-20T05:27:42+5:30

कोरोनामुळे जगातील आरोग्य सेवा आणि अर्थव्यवस्था कोलमडली असली तरी. आयओसी मात्र टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन २४ जुलैपासून करण्यावर ठाम आहे.

Tokyo Olympics to be held in scheduled time - IOA | टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेतच होईल - आयओए

टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेतच होईल - आयओए

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील अनेक क्रीडा आयोजनांवर संशयाचे ढग घोंघावत असताना भारतीय आॅलिम्पिक संघटनेने मात्र टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन २४ जुलै ते १२ आॅगस्ट या निर्धारित कालावधीतच होतील, असा विश्वास व्यक्त करीत आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीच्या ‘सुरात सूर’ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनामुळे जगातील आरोग्य सेवा आणि अर्थव्यवस्था कोलमडली. आयओसी मात्र टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन २४ जुलैपासून करण्यावर ठाम आहे. आयओएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची जगभर दहशत आहे. मात्र एक किंवा दोन महिन्यात यावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल, अशी आम्हाला खात्री आहे. या विषाणूचे केंद्र असलेल्या चीनने यावर नियंत्रण मिळविले. आॅलिम्पिकचे आयोजनदेखील विनाअडथळा ठरल्यावेळी होईल, असा विश्वास वाटतो.’
आयओसी आमची सर्वोच्च संस्था असून, ही संस्था जो निर्णय घेईल त्याचे आम्ही पालन करू. आयओसीने आॅलिम्पिकचे आयोजन ठरल्यावेळी केल्यास कुठल्याही स्थितीत आम्हाला सहभागी व्हावे लागेल, असे या अधिकाºयाचे मत आहे.
आयओसीच्या भूमिकेवर अनेक दिग्गज खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयओसी आमच्या आरोग्याशी खेळत असल्याचा या खेळाडूंचा आरोप असून, अनेक अधिकाऱ्यांनी आयोजनाविषयी शंका उपस्थित केली. याचे उत्तर देत आयओसीने बुधवारी सद्यस्थितीचे कुठलेही आदर्श समाधान झाले नसल्याचे म्हटले होते.
कोरोनामुळे आमच्या तयारीला मोठा फटका बसल्याची कबुली देत आयओएने आॅलिम्पिकचे आयोजन ठरल्यानुसार झाले तरी १० किंवा त्याहून अधिक पदके जिंकण्याची आम्हाला आशा असल्याचे म्हटले आहे. हा अधिकारी पुढे म्हणाला, ‘आमच्या तयारीला फटका बसला, हे सत्य आहे. कोरोनामुळे आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा, चाचणी स्पर्धा आणि विदेशात आयोजित होणारी शिबिरे रद्द किंवा स्थगित करावी लागली. हे केवळ भारतासोबत घडले नाही तर प्रत्येक देशाची हीच स्थिती आहे. यामुळे सहभागी होणाºया प्रत्येक देशाच्या खेळाडूला समान संकटाचा सामना करावा लागू शकतो.
त्यामुळेच टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारत १० किंवा त्याहून अधिक पदके जिंकेल, असा आयओएला विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था)

आयओएचे ‘वर्क फ्रॉम होम’
कोरोनामुळे भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे कर्मचारी सोमरवारपासून घरूनच काम करणार आहेत. आयओए सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाºयांना घरून काम करता यावे यासाठी त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. कोरोनाचा धोका अधिक गंभीर होत असून, आम्ही कर्मचाºयांचा जीव धोक्यात टाकू इच्छित नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाने मुंबईतील आपले मुख्यालय काही दिवसांसाठी बंद केले आहे. १६ मार्चपासून बीसीसीआयचे कर्मचारी घरी बसून काम करीत आहेत.

आॅलिम्पिक मशाल जपानमध्ये !
कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यानंतर जगभरातील क्रीडा स्पर्धा, बैठक, सराव सत्र बंद करण्यात आल्यानंतरही गुरुवारी झालेल्या एका सोहळ्यादरम्यान ग्रीसने प्रतिष्ठेची आॅलिम्पिक मशाल टोकियो आॅलिम्पिक समितीकडे सोपविली. या सोहळ्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश नव्हता.
प्रेक्षकांविना झालेल्या या कार्यक्रमात आॅलिम्पिक जिम्नास्ट चॅम्पियन लेफ्टेरिस पेट्रोनियास मशाल घेऊन धावली. तसेच आॅलिम्पिक पोल वॉल्ट चॅम्पियन कॅटरिना स्टेफनिडी हिने पॅनथैनेसिक स्टेडियममधील आॅलिम्पिक अग्निकुंड प्रज्वलित केले. यानंतर ही मशाल टोकियो आॅलिम्पिक समितीचे प्रतिनिधी नाओको इमोतो यांच्याकडे सोपविण्यात आली.
इमोतो स्वत: जलतरणपटू असून तिने १९९६ साली अटलांटा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. ग्रीसमध्येच वास्तव्यास असलेल्या इमोतो यांना अखेरच्या क्षणी टोकियो समितीत सहभागी करण्यात आले; कारण या सोहळ्यासाठी त्यांना जपानहून प्रवासाची गरज नव्हती.

अ‍ॅथलेटिक्स संघटनेला स्पर्धा आयोजनाची शंका

लंडन : ‘कोरोनाच्या प्रकोपामुळे टोकियो आॅलिम्पिक या वर्षाअखेरपर्यंत स्थगित होऊ शकते,’ अशी कबुली जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रमुख सॅबेस्टियन को यांनी दिली. आयोजनाबाबत ठोस निर्णय घेणे सध्यातरी घाईचे ठरेल, असेही ते म्हणाले. खेळाडूंची चिंता लक्षात घेता आॅलिम्पिक आयोजनास सध्यातरी आदर्श स्थिती नसल्याची कबुली टोकियो आॅलिम्पिक प्रमुखांनी दिली होती.
आयओसी प्रमुख थॉमस बाक यांनी मात्र २४ जुलैपासूनच आॅलिम्पिक आयोजन करण्यावर आम्ही ठाम आहोत, असे म्हटले होते. टोकियो आॅलिम्पिक समन्वयक आयोगाचे सदस्य को यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आॅलिम्पिक आयोजनास उशीर होऊ शकतो, असे सांगितले. आयोजन सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलले जाईल का, यावर ते म्हणाले,
‘शक्य आहे, सर्व काही शक्य आहे.
काहीही असो, आम्हाला आयोजन करायचेच आहे, असे म्हणण्याची ही आदर्श वेळ नाही. आम्ही ठामपणे आयोजनाची तारीख ठरविण्याच्या स्थितीत नाही. २०२१ पर्यंत आॅलिम्पिक स्थगित केल्याने मात्र नवी समस्येची भीती आहे. आॅलिम्पिक वर्षात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करीत नसल्याने क्रीडा क्षेत्रात अनेक नव्या अडचणी निर्णाण होण्याचा
धोका आहे.’

प्रज्ज्वलन मशालीचे!
ग्रीसची अभिनेत्री झांती गॉर्जिओ हिने (उजवीकडे) पारंपरिक ग्रीक वेशभूषेत प्रतिष्ठेच्या आॅलिम्पिक मशालीचे प्रज्ज्वलन केले. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या हा सोहळा पार पडल्यानंतर ही मशाल ग्रीसने जपान आॅलिम्पिक समितीच्या सदस्या आणि आॅलिम्पियन जलतरणपटू नाओको इमोतो यांच्याकडे सुपूर्द केली.

Web Title: Tokyo Olympics to be held in scheduled time - IOA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.