Tokyo Olympics: भारताला मोठा धक्का, विनेश फोगाट उपांत्यपूर्व फेरीत पराभूत, ...तर मिळू शकते ब्राँझ मेडल जिंकण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 10:06 AM2021-08-05T10:06:21+5:302021-08-05T10:48:31+5:30
Tokyo Olympics Live Update: महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगाट पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.
टोकियो - यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत दमदार कामगिरी केली आहे. कुस्तीमध्येही रवी कुमार दहिया याने अंतिम फेरीत धडक देत सुवर्णपदकाची आस जागवली आहे. मात्र कुस्तीमध्ये महिलांच्या गटामध्ये आज झालेल्या लढतीत भारताला अपयशाचा सामना करावा लागला. एकीकडे कांस्यपदकसाठीच्या रिपिचेज फेरीत भारताच्या अंशू मलिकला पराभव पत्करावा लागला. तर महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगाट पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.
आज महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५३ किलो वजनी गटामध्ये विनेश फोगाटने पहिली लढत जिंकून दमदार सुरुवात केली. मात्र उपांत्यपूर्व लढतीत विनेशला बेलारूसच्या वनेसा कालाडझिन्स्काया हिचे आव्हान परतवणे विनेशला शक्य झाले नाही. बेलारुसच्या कुस्तीपटूने विनेशला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले. दरम्यान, वनेसा कालाडझिन्स्काया हिने घेतलेली आघाडी मोडून काढणे विनेशला अखेरपर्यंत शक्य झाले नाही. अखेर विनेशला या लढतीत ३-९ अशा गुणफरकाने पराभव पत्करावा लागला. आता वनेसा कालाडझिन्स्काया ही उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचल्यास विनेशला रेपिचेज फेरीतून पदक जिंकण्याची संधी असेल.
#TokyoOlympics | Wrestling, Women's 53kg Freestyle, 1/8 Final: Vinesh Phogat loses to Vanesa Kaladzinskaya 9-3
— ANI (@ANI) August 5, 2021
(File pic) pic.twitter.com/KknTKMtn6F
दरम्यान, भारताच्या रवी कुमार दहियाने ५७ किलो फ्रीस्टाईल गटात कझाखस्तानच्या नूरइस्लाम सानायेव याला नमवत अंतिम फेरी गाठली आहे. तर ८६ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत दीपक पुनिया अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलरविरुद्ध निष्प्रभ ठरला. एकतर्फी झालेल्या या लढतीत टेलरने पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करत ९-० अशी भक्कम आघाडी मिळवली. यानंतर त्याने १०-० अशा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपककडे अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे