Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी आणि ६ कोटींचं बक्षीस!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 09:26 AM2021-06-25T09:26:38+5:302021-06-25T09:27:08+5:30
टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेला (tokyo olympics) २३ जुलैपासून सुरुवात होत आहे. यातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठी घोषणा केली आहे.
टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेला (tokyo olympics) २३ जुलैपासून सुरुवात होत आहे. यातच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठी घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री खट्टर यांनी दिलं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री खट्टर यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची संवाद साधला. यावेळी त्यांनी सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना सरकारी नोकरी आणि ६ कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना शिक्षण विभागात सरकारी नोकरी दिली जाईल. याशिवाय क्रीडा विभागात प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं तर राज्यातील क्रीडा क्षेत्राला मोठं प्रोत्साहन मिळेल. याचा युवा खेळाडूंना मोठा फायदा होईल, असंही ते म्हणाले. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं नवी रणनीती आखली आहे. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना तीन टक्के आरक्षणासह सरकारी सेवा दिल्या जाणार आहेत, असंही खट्टर म्हणाले.
ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी प्रत्येकी ५ लाख
राज्यातील विविध स्टेडियम्सचं नुतनीकरण केलं जात असल्याचं खट्टर यांनी नमूद केलं. तर क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार टोकियो ऑलिम्पिकसाठी हरियाणातून ३० खेळाडूंची निवड झाली आहे. प्रत्येक खेळाडूला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
पदक विजेत्या खेळाडूंना मोठं बक्षीस
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना ६ कोटी रुपयांचं, तर रौप्य पदकाची कमाई करणाऱ्यांना ४ कोटी रुपये आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना २.५ कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा संदीप सिंह यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून क्रीडा परिसरात ११ हजार रोपं लावण्याचाही संकल्प राज्य सरकारनं केला आहे.