Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये उद्या महामुकाबला, भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; ही आहे स्पर्धेची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 01:55 PM2021-08-06T13:55:06+5:302021-08-06T13:58:21+5:30
Tokyo Olympics Live Updates: शनिवारी होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम लढतीमधून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. मात्र भारताच्या या सुवर्ण मोहिमेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून कडवी टक्क मिळण्याची शक्यता आहे.
टोकियो - जपानची राजधानी टोकियो येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंची कामगिरी समाधानकारक झाली आहे. स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण पाच पदके जिंकली आहेत. (india at olympics 2021) दरम्यान, शनिवारी होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम फेरीमधून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. मात्र भारताच्या या सुवर्ण मोहिमेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून कडवी टक्क मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे उद्या होणाऱ्या भालाफेकीच्या अंतिम फेरीमध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम आमने सामने येणार आहेत. (neeraj chopra vs arshad nadeem) ऑलिम्पिकमधील भालाफेकीच्या अंतिम लढतीला शनिवारी संध्याकाळी ४.३० पासून सुरुवात होईल. (India-Pakistan to face each other in javelin throw in Olympics tomorrow)
पुरषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अपेक्षित कामगिरी करताना पहिल्याच प्रयत्नात थेट अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे अंतिम फेरीसाठी झालेल्या पात्रता फेरीत त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली होती. त्याने ८६.६५ मीटरची जबरदस्त भाला फेक केली होती. दरम्यान, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने पात्रता फेरीच्या ब गटात ८५.१६ मीटर भाला फेक करत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या १२ खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानी राहिला होता. जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू आणि सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार जर्मनीच्या योहानेस वेटेर याने ८५.६५ मीटर लांब भाला फेक केली होती. तो दुसऱ्या स्थानावर राहिला होता. दरम्यान अंतिम लढतीत या आघाडीच्या तीन खेळाडूंनी इतर भालाफेकपटूंकडूनही कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. मात्र मुख्य आकर्षण हे भारताचा नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यातील जुगलबंदी हेच असणार आहे.
आता अॅथलेटिक्समध्ये भारताच्या पदकाचा एकमेव दावेदार असलेल्या नीरज चोप्रा याने आपल्या कामगिरीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, मी ऑलिम्पिक स्पर्धेत चांगले अनुभव घेत आहे. सरावादरम्यान माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, मात्र प्रत्यक्ष स्पर्धेत मी चांगली लय मिळवली आणि अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरलो. पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळत असल्याने हा अनुभव वेगळा ठरेल. शारीरिकदृष्ट्या सर्वजण कठोर मेहनत घेतात, पण आता मानसिकरीत्याही सज्ज रहावे लागेल. मला जास्तीत जास्त अंतर पार करायचे आहे.
दुसरीकडे पाकिस्तानची ऑलिम्पिकमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांचे मोजके क्रीडापटूच स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. त्यातही त्यांना या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकही पदक जिंकला आलेले नाही. मात्र अर्शद नदीमकडून पाकिस्तानला पदकाची अपेक्षा असेल.