Tokyo Olympics: कुस्तीत भारताची जोरदार मुसंडी, रवी दहिया, दीपक पुनियाची उपांत्य फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 10:05 AM2021-08-04T10:05:29+5:302021-08-04T10:40:01+5:30
Tokyo Olympics Live Updates : फ्रीस्टाईल कुस्तीच्या लढतींमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया या भारतीय कुस्तीपटूंनी जोरदार खेळ करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या लढतींना सुरुवात झाल्यापासून भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून येऊ लागला आहे. आज झालेल्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या लढतींमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया या भारतीय कुस्तीपटूंनी जोरदार खेळ करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियाने जबरदस्त कामगिरी केली. बल्गेरियाच्या व्हेलेंटिनोव्हविरोधात झालेल्या या लढतीत रवी कुमार दहियाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. अखेर या लढतीत १४-४ अशी आघाडी घेत टेक्निकल सुपियॉरिटीच्या जोरावर विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी रवी कुमार दहियाने उपउपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाच्या ओस्करचा १३-२ असा धुव्वा उडवला होता.
𝙍𝙖𝙫𝙞 𝙠𝙖 𝙠𝙝𝙪𝙢𝙖𝙧 , #Tokyo2020 𝙢𝙚𝙞𝙣 𝙗𝙖𝙧𝙠𝙖𝙧𝙖𝙖𝙧 🤩🤩
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
Ravi Kumar enters the semi-final in the men's 57kg category in his debut #Olympics appearance! #StrongerTogether | #UnitedByEmotion | #BestOfTokyopic.twitter.com/6eKrpKnmss
तर पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या गटात भारताच्या दीपक पुनियाने देशासाठी जबरदस्त कामगिरी करत देशासाठी पदकाची आस जागवली. भारताचा दीपक पुनिया आणि चीनचा शेन यांच्यातील ही लढत रोमहर्षक झाली. या लढतीत दीपक पुनियाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र खेळाच्या मध्यावर चिनी कुस्तीपटूने जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपण्यासाठी काही सेकंदांचा वेळ असताना दीपकने निर्णायक डाव खेळत २ गुण कमावले आणि विजय निश्चित केला.
आता उपांत्य लढतीत रवी कुमार दहियाचा सामना कझाकिस्तानच्या नुरिस्लामशी होणार आहे. तर दीपक पुनियाचा सामना अमेरिकन कुस्तीपटूसोबत होणार आहे.