Tokyo Olympics: लवलीनाचे पदक निश्चित, सिंधू उपांत्य फेरीत, मात्र नेमबाजांनी केले निराश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:30 AM2021-07-31T06:30:59+5:302021-07-31T06:31:41+5:30
Tokyo Olympics Live Updates: युवा महिला मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वर्चस्वपूर्ण विजयासह शुक्रवारी उपांत्यफेरी गाठली.
टोकियो : युवा महिला मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वर्चस्वपूर्ण विजयासह शुक्रवारी उपांत्यफेरी गाठली. भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनीदेखील विजयी पतका कायम ठेवत आशा पल्लवित राखल्या.
लवलीनाने महिलांच्या ६९ किलो गटात चायनीज तायपेईची माजी विश्वविजेती नियेन चीनवर विजय नोंदविला. मीराबाई चानूच्या रौप्य पदकामुळे भारत पदक तालिकेत ४९व्या स्थानावर आहे. लवलीनाला उपांत्य सामन्यात सध्याची विश्वविजेती तुर्कस्थानची बुसानेज सुरमेनेली हिचे आव्हान असेल. सिमरनजीत कौर ही ६० किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व लढतीेत थायलंडची सुदापोर्न सिसोंदीकडून एकतर्फी पराभूत झाली.
बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूने जपानची पाचव्या स्थानावरील अकाने यामागुची हिच्यावर ५६ मिनिटात २१-१३, २२-२० असा विजय साजरा केला.
पुरुष हॉकी संघाने अखेरच्या साखळी सामन्यात जपानवर ५-३ने तसेच महिला संघाने आयर्लंडवर १-०ने विजय नोंदविला.
तीरंदाजीत मात्र दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत सहा मिनिटांत कोरियाची ॲन सॅनकडून पराभूत होताच बाहेर पडली. ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळे ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत दाखल होऊ शकला नाही. दुतीचंद ही शंभर मीटर शर्यतीत हिटमध्ये बाद झाली.नेमबाजीत पुन्हा एकदा निराशा पदरी पडली. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात मनू भाकर आणि राही सरनोबत अपयशी ठरल्याने अंतिम फेरी गाठू शकल्या नाहीत.
पाल नौकायानात विष्णू सरवणन आधीच पदकाच्या शर्यतीतून बाद झाला. गोल्फमध्ये अनिर्बान लाहिरी १६ होलनंतर संयुक्त २०व्या स्थानी आला. अश्वारोहण प्रकारात भारताचा फवाद मिर्झा ड्रेसेजच्या दोन फेऱ्यानंतर सातव्या स्थानावर आला आहे.
सिंधूने अवघ्या ५६ मिनिटात जिंकला सामना!
टोकियो : विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिक बॅडमिंटन महिला एकेरी गटात शानदार विजयासह उपांत्य सामन्यात धडक मारताना कट्टर
प्रतिस्पर्धी जपानच्या अकाने यामागुचीला सरळ दोन गेममध्ये नमवले. सामना केवळ दोन गेममध्ये झाला असला, तरी दोन्ही खेळाडूंनी यावेळी उच्च दर्जाचा खेळ करत सामना कमालीचा रोमांचक केला. या शानदार विजयासह सिंधू आता पदकापासून केवळ एक विजय मिळवण्यापासून दूर
आहे.
सिंधूच्या या दिमाखदार कामगिरीनंतर भारताच्या ऐतिहासिक सुवर्ण पदकाची आशा कायम राहिली आहे. साखळी फेरीत निर्विवाद वर्चस्व राखताना सिंधूने म्हटले होते की, ‘यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारची सिंधू पाहण्यास मिळेल.’ आपले शब्द खरे करून दाखवताना सिंधूने आपल्या खेळात केलेला मोठा बदल दाखवून दिला. बचाव आणि आक्रमणाचा योग्य ताळमेळ साधत सिंधूने यामागुचीला २१-१३, २२-२० असा धक्का दिला. संपूर्ण कोर्टचा जबरदस्त वापर करताना सिंधूने रॅलीजवर अधिक भर दिला आणि यामागुचीला कोर्टभर नाचवले. सिंधूने मागे पुढे येत फटके परतवताना यामागुचीला घाम फोडला.
परंतु, यामागुचीने अपेक्षित झुंज देताना सिंधूलाही सहजासहजी विजय मिळवून दिला नाही. पहिला गेम मोठ्या फरकाने गमावल्यानंतर यामागुचीने दुसऱ्या गेममध्ये सहा गुणांची पिछाडी भरून काढत सिंधूला चांगलेच झुंजवले. एका क्षणी तिने २०-१७ अशी आघाडी घेत सामना तिसऱ्या गेममध्ये नेण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु, सिंधूने यावेळी सलग तीन गुण जिंकत यामागुचीला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. याआधी मार्चमध्ये झालेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतही सिंधूने यामागुचीला नमवले होते. सिंधूचा तिच्याविरुद्धचा जय-पराजयाचा रेकॉर्ड आता १२-७ असा झाला आहे.
लवलीनाची उपांत्य फेरीत धडक
टोकियो : दिग्गज बॉक्सर मेरीकोमच्या पराभवाचे दु:ख विसरण्यास लावणारी ‘लव्हली’ कामगिरी करताना बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत प्रवेश करत भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील आणखी एक पदक निश्चित केले. लवलीनाने ६९ किलो वजनी गटात चिनी तैपईची माजी विश्वविजेती नियेन चीन चेन हिला नमवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
लवलीनाने चेनचा ४-१ असा पराभव करत शानदार बाजी मारली. पुढील फेरीत तिला आता विद्यमान विश्वविजेती तुर्कीच्या बुसानेज सुरमेनेली हिच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. बुसानेजने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या अॅन्ना लिसेंको हिचा पराभव केला.
६० किलो वजनी गटात भारताच्या सिमरनजीत कौरचा उप-उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत थायलंडच्या सुदापोर्न सीसोंदी हिने ५-० असे सहजपणे नमवले.
n लवलीनाने जबरदस्त संयमी खेळ करताना चेनला पराजित केले. सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतलेल्या लवलीनाने नंतर अखेरपर्यंत बचावावर अधिक भर देताना संधी मिळताच चेनला जोरदार प्रत्युत्तरही दिले. या शानदार विजयानंतर राष्ट्रीय प्रशिक्षक मोहम्मद अली कमर यांनी सांगितले की, ‘प्रत्युत्तर आक्रमणावर लवलीनाने चांगली तयारी केली होती आणि तिने आपल्या उंचीचा चांगला फायदा घेतला. याआधी चेनविरुद्धच ती अतिआक्रमणाच्या प्रयत्नात पराभूत झाली होती, पण यावेळी तिने आपल्या चुका सुधारल्या. तिने अतिआक्रमकता टाळली आणि अखेरपर्यंत आखलेल्या योजनेनुसार खेळ केला.’