Tokyo Olympics: नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचे दिले होते इतिहास रचण्याचे संकेत; भविष्यवाणीचं 'ते' ट्विट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 11:00 AM2021-08-08T11:00:04+5:302021-08-08T11:03:38+5:30
Tokyo Olympics: नीरज चोप्रानं इतिहास घडवला; ऍथलेटिक्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल
टोकियो: सुरुवातीपासून पदकाची आशा बाळगली जात होती त्या भालाफेकपटू नीरज चोप्राने अपेक्षेप्रमाणे टोकियो ऑलिम्पिकचा समारोप भारतासाठी सोनेरी यशाने केला. भारताची सुरुवात मीराबाई चानूच्या चंदेरी यशाने झाली होती. चंदेरी यशाने सुरुवात आणि सोनेरी यशाने समारोप होणारे हे भारतासाठी पहिलेच ऑलिम्पिक ठरले. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ आणि नंतर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरची भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावले.
नीरज चोप्रा हा सुरुवातीपासूनच भालाफेकीत पदकाचा दावेदार मानला जात होता. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरवर केलेली भालाफेक ही त्याला सुवर्णपदक जिंकून देणारी ठरली. विशेष म्हणजे नीरज हा पात्रता फेरीतही पहिल्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी त्याने ८६.६५ मीटरची फेक केली होती.
एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू हा नीरजचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणा देणारा आहे. विशेष म्हणजे खेळावरचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी नीरज फोनदेखील स्विच ऑफ ठेवायचा. आईसोबत बोलण्यासाठी तो फोन ऑन करायचा. त्यानंतर पुन्हा फोन ऑफ करून सरावाला लागायचा. नीरजच्या कष्टाचं अखेर टोकियो ऑलिम्पिकमध्ये चीज झालं. यानंतर नीरजचं एक ट्विट चर्चेत आलं आहे.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) November 15, 2017
२०१६ वर्ष नीरजनं गाजवलं होतं. जागतिक २० वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप, दक्षिण आशियाई स्पर्धेत त्यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर आशियाई ज्युनियर चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकलं. २०१७ मध्ये त्यानं एक ट्विट केलं होतं. त्यातून नीरजनं आपले इरादे स्पष्ट केले होते. 'जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे. जब मेहनत के अलावा ओर कुछ अच्छा ना लगे. जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो. समझ लेना सफलता का नया इतिहास रचने वाला है,' अशा भावना त्यावेळी नीरजनं व्यक्त केल्या होत्या. काल नीरजनं इतिहास रचला आणि अनेकांना त्याच्या ४ वर्षांपूर्वीच्या ट्विटची आठवण झाली.