Tokyo Olympics: बजरंगकडून आता कांस्यची अपेक्षा, उपांत्य फेरीत झाला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 09:29 AM2021-08-07T09:29:29+5:302021-08-07T09:30:02+5:30
Tokyo Olympics Updates:
चीबा (जपान) : कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाचा सर्वात मोठा दावेदार असलेल्या बजरंग पुनियाच्या पराभवाने भारताच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. उपांत्य फेरीत झालेल्या या पराभवानंतर आता बजरंग कांस्य पदकासाठी लढेल. लेग डिफेन्स ही बजरंगची कमजोरी ठरली आहे आणि येथेच त्याचा पराभव झाला. तीन वेळचा विश्वविजेता अझरबैजानच्या हाजी अलीवने बजरंगची कमजोरी ओळखून त्यानुसार खेळ केला आणि त्याला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे, महिलांमध्ये सीमा बिस्ला पहिल्याच फेरीत पराभूत झाली. बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाईल गटातून शानदार सुरुवात केली होती. त्याने किर्गिस्तानच्या अर्नाजर अकमातालिएव याचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला.
सीमाकडून निराशा
महिलांच्या ५० किलो गटाच्या पहिल्या फेरीत सीमा बिस्लाला पराभव पत्करावा लागला. ट्युनिशियाच्या सारा हमदीने तिला
१-३ असे नमवत स्पर्धेबाहेर केले.
बजरंगची वाटचाल!
किर्गिस्तानच्या मल्लाने १-३ अशा पिछाडीवरून ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र २ गुणांचा एक डाव खेळल्याने बजरंग विजयी ठरला. यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मुर्तझा चेका घियासीला सहज नमवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत बजरंगने पहिला गुण मिळवत चांगली सुरुवात केली. मात्र, यानंतर रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या अलीवचे वर्चस्व राहिले.