Tokyo Olympics: सिंधूची विजयी घोडदौड, सलग दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 08:51 AM2021-07-28T08:51:37+5:302021-07-28T08:52:20+5:30
Tokyo Olympics Live Updates: सिंधूने महिला एकेरीमध्ये आज झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली.
टोकियो - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. सिंधूने महिला एकेरीमध्ये आज झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली. सिंधूने हा सामना २१-९, २१-१६ असा जिंकला. (PV Sindhu beats Hong Kong's Ngan Yi Cheung & cruises into Pre-QF of Badminton Women's Singles)
आज हाँगकाँगच्या नगन यी चेंग हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत सिंधूने पहिल्या लढतीप्रमाणेच आक्रमक खेळ करत एकतर्फी वर्चस्व राखले. सिंधूने पहिला गेम २१-९ असा आरामात जिंकत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये हाँगकाँगच्या खेळाडूने सिंधूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची झुंज मोडीत काढत हा गेमही सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकत पुढची फेरी गाठली.
#TokyoOlympics: Indian shuttler PV Sindhu (in file photo) beats Hong Kong's Ngan Yi Cheung 21-9, 21-16 in women singles group stage pic.twitter.com/PJi2wVEqoi
— ANI (@ANI) July 28, 2021
तत्पूर्वी पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली होती. पी.व्ही. सिंधू आणि इस्राइलची केसेनिया पोलिकारपोव्हा यांच्यातील लढत कमालीची एकतर्फी झाली. सिंधूने या लढतीवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या गेममध्ये २१-७ अशी बाजी मारल्यानंतर सिंधूने दुसरा गेमही २१-१० असा आरामात जिंकला आणि अवघ्या २८ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला होता.