Tokyo Olympics: सुवर्णासाठी धावला, विश्वविक्रम मोडला, आनंदात जर्सीही फाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:44 AM2021-08-04T06:44:46+5:302021-08-04T06:45:24+5:30
Tokyo Olympics: पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीचे सुवर्ण नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने विश्वविक्रमासह जिंकले. एका सेकंदाच्या फरकाने आपण हा पराक्रम केला, हे समजताच कार्स्टनने स्वत:ची जर्सी फाडून आनंद साजरा केला.
टोकियो : पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीचे सुवर्ण नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने विश्वविक्रमासह जिंकले. एका सेकंदाच्या फरकाने आपण हा पराक्रम केला, हे समजताच कार्स्टनने स्वत:ची जर्सी फाडून आनंद साजरा केला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडूंनी विश्वविक्रम मोडण्याची अनोखी कामगिरी केली. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अमेरिकेच्या राइ बेंजामिननेही विश्वविक्रम मोडला.
दोनदा जगज्जेता बनलेल्या कार्स्टनने मंगळवारी ४५.९५ सेकंदात अंतिम शर्यत पूर्ण केली. सातपैकी सहा खेळाडूंनी आपापले राष्ट्रीय विक्रम मोडले. कार्स्टनने याआधी एक जुलै रोजी ओस्लोमध्ये ४६.७० सेकंदांचा विश्वविक्रम नोंदविला होता. स्वत:चा हा विक्रम आज येथे मोडीत काढला.
बेजामिनने ४६.१७ सेकंदांचा वेळ घेत आपल्या स्वत:चा जुना विक्रम मोडला. ब्राझीलच्या एलिसन डोस सांतोसला कांस्यपदक मिळाले. डोसने ४६.७२ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. ही डोसची सर्वोत्तम कामगिरी ठरली.