Tokyo Olympics: या खेळाडूंनी भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये केली पदकांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:42 AM2021-08-09T05:42:52+5:302021-08-09T05:43:25+5:30
Tokyo Olympics: एका सुवर्णसह सात पदके मिळवली, सर्वात यशस्वी स्पर्धा
नवी दिल्ली : भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण पदकासह सात पदके मिळवली. आणि आपल्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भरतात पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे प्रदर्शन आणि त्यांच्या कामगिरीवर एक नजर,
नीरज चोप्रा
भालाफेक ॲथलिट नीरज चोप्रा हा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. नीरज गेल्या तीन वर्षांपासून ऑलिम्पिक पदकाचा दावेदार मानला जात होता. त्याने शनिवारी ८७.५८ मीटर भालाफेक करून पदक जिंकले. खांदरा, जि. पानिपत येथील शेतकऱ्याचा हा मुलगा फक्त वजन कमी करण्यासाठी खेळायला लागला होता. त्यानंतर त्याच्या काकांनी त्याला १५ किमी दूर असलेल्या शिवाजी स्टेडिअममध्ये नेले नीरजला धावण्यापेक्षा भाला फेक करण्यात आनंद मिळत होता. आणि तो आज भारताचा सर्वात यशस्वी ॲथलीट बनला आहे.
मीराबाई चानू
टोकियोत पहिल्याच दिवशी तीने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. तीने १०२ किलो वजन उचलत रियोतील अपयश झटकून टाकले. नोंगपोक काकजिंग या इम्फाळजवळच्या गावात लाकडे तोडण्यात तीचे लहानपण गेले. तीला तिरंदाज बनायचे होते. मात्र मणिपूरच्या कुंजरानी देवीबद्दल ऐकल्यावर तीने भारोत्तलनाकडे लक्ष दिले.
रवी दहिया
हरयाणाच्या सोनिपतच्या नाहरी गावचा रवी याने पुरूषांच्या ५७ किलो गटात फ्री स्टाईल कुस्तीत रौप्य पदक जिंकले. त्याने दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये प्रशिक्षण घेतले. त्याचे वडील राकेशकुमार यांनी त्याला वयाच्या १२ व्या वर्षी छत्रसाल स्टेडिअमध्ये पाठवले. त्याचे वडील दररोज घरापासून ६० किमी अंतरावर असलेल्या छत्रसाल स्टेडिअममध्ये दुध आणि लोणी घेऊन जात असत.
पी.व्ही. सिंधू
टोकियो २०२० च्या सिंधूला पहिल्या पदकासाठी दावेदार मानले जात होते. कांस्य पदक जिंकले. २६ वर्षांच्या या खेळाडूने २०१६ मध्ये रौप्य पदक मिळवले होते. ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ती भारताची दुसरी खेळाडू आणि पहिली महिला आहे.
पुरूष हॉकी संघ
भारतीय पुरूष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकून ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ दूर केला. देशात हॉकीला लोकप्रिय बनवण्यासाठी हे पदक मोलाचे ठरत आहे. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारताने १-७ असे पराभव स्विकारला होता. मात्र कर्णधार मनप्रीतच्या नेतृत्वातील या संघाने शानदार खेळ केला. उपांत्य फेरीतील पराभवानंतर कांस्य पदक प्ले ऑफमध्ये जर्मनीला ५-४ अशी मात दिली. यात कर्णधार मनप्रीत सिंह आणि गोलकिपर पी.आर. श्रीजेश यांनी शानदार खेळ केला.
लवलीना बोर्गेहेन
असामच्या लवलीना हीने ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकून इतिहास निर्माण केला आहे. विजेंदर आणि मेरी कोम यांच्यानंतर पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय महिला आहे. २३ वर्षांच्या लवलीना हीला किक बॉक्सर बनायचे होते. ऑलिम्पिक तयारीसाठी युरोपला जाण्याआधी ती कोरोना संक्रमीत झाली. त्यातून शानदार पुनरागमन केले आणि ६९ किलो गटात पदक मिळवले.
बजरंग पुनिया
बजरंग याला पदकाचा दावेदार मानले जात होते. मात्र उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर त्याने कांस्य पदक मिळवले. त्याच्यात कुस्तीप्रती समर्पण आधीपासूनच होते. असे सांगितले जाते की, २००८ मध्ये स्वत: ३४ किलोचा असतांनाही तो ६० किलोच्या पहेलवानाशी भिडला होता आणि त्याला पराभूत केले होते.
हे राहिलेत पदकापासून दूर
महिला हॉकी संघ रियोत अखेरच्यास्थानावर असलेल्या या संघाने टोकियोत चौथे स्थान मिळवले. महिला संघाला कांस्य पदकाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला.
दीपक पुनिया
दीपक पुनिया याने कुस्तीत ८६ किलो गटात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत तो चांगल्या स्थितीत होता. मात्र अखेरच्या दहा सेकंदात बाजी पलटली आणि त्याला विरोधी पहेलवानाला मात दिली.
अदिती अशोक
महिला गोल्फमध्ये २०० वे रँकिंग असलेल्या अदिती अशोक हिने अखेरच्या फेरीत दोन शॉटने मागे राहिली. आणि चौथ्या स्थानावर पोहोचली. रियोत ती ४१ व्या स्थानावर राहिली हाेती. मात्र तीच्या खेळाने देशाचे लक्ष गोल्फकडे वेधले.