Tokyo Olympics: रवी दहियाचे सुवर्ण यश एका पावलाने दूर; दीपक पूनियाला कांस्यची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:52 AM2021-08-05T07:52:11+5:302021-08-05T07:52:49+5:30
Tokyo Olympics Live Updates: ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजांनंतर पदकांची सर्वाधिक आशा होती ती कुस्तीपटूंकडून. नेमबाजांनी निराशा केली असली, तरी कुस्तीपटूंनी मात्र आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना पदकांचे खाते उघडले आहे.
चीबा (जपान) : ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजांनंतर पदकांची सर्वाधिक आशा होती ती कुस्तीपटूंकडून. नेमबाजांनी निराशा केली असली, तरी कुस्तीपटूंनी मात्र आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना पदकांचे खाते उघडले आहे. यामध्ये सर्वांत प्रभावी ठरला तो रवी दहिया. रवीने ५७ किलो फ्रीस्टाईल गटात कझाखस्तानच्या नूरइस्लाम सानायेव याला नमवत अंतिम फेरी गाठली आहे. त्याचवेळी, दीपक पूनिया व अंशू मलिक यांना पराभव झाल्याने आता कांस्य पदकासाठी लढावे लागेल.
अत्यंत थरारक झालेल्या उपांत्य सामन्यात रवी एका क्षणाला २-९ असा पिछाडीवर होता. मात्र, त्याने जबरदस्त पुनरागमन करत सानायेव याला जोरदार टक्कर देत सामन्याचे चित्रच पालटले. सानायेववर पकड मिळवत त्याला मॅटवर चीत करत रवीने लढत जिंकली आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. रवीने याआधीचे दोन्ही सामने तांत्रिक गुणांच्या आधारे जिंकले. पहिल्या फेरीनंतर रवीकडे २-१ अशी आघाडी होती. मात्र, सानायेवने रवीच्या डाव्या पायावर आक्रमण करत त्याला तीनवेळा पलटण्यास भाग पाडत थेट सहा गुणांची कमाई केली होती.
पूनिया मोक्याच्या क्षणी चुकला
- दीपक पूनियाने ८६ किलो वजगी गटात सोप्या ड्रॉचा फायदा घेत आगेकूच केली. पहिल्या फेरीत त्याने नायजेरियाच्या एकेरेकेमे एगियमोर याला मात दिली. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने चीनच्या जुशेन लिन याला ६-३ असे लोळवले.
- उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलरविरुद्ध दीपक निष्प्रभ ठरला. एकतर्फी झालेल्या या लढतीत टेलरने पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करत ९-० अशी भक्कम आघाडी मिळवली. यानंतर त्याने १०-० अशा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपककडे अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.