Tokyo Olympics: मीराबाई चानूला मिळू शकतं 'सुवर्ण'पदक; चीनच्या गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरची डोपिंग चाचणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:15 PM2021-07-26T14:15:10+5:302021-07-26T14:22:47+5:30
Tokyo Olympics: भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू ( Mirabai Chanu) हीनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करताना इतिहास घडवला.
Tokyo Olympics: भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू ( Mirabai Chanu) हीनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करताना इतिहास घडवला. महिलांच्या ४९ किलो वजनी गटाच्या भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या खेळाडूंना तोडीस तोड लढत देत वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्यपदकाची कमाई केली. २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नाम मल्लेश्वरीने भारोत्तोलनमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पदक पटकावणारी मीराबाई चानू ही भारताची दुसरी भारोत्तोलक ठरली. पण, तिचे हे रौप्यपदक सुवर्णपदकात बदलू शकते.
भारोत्तोलनाच्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात शनिवारी मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. या गटाच चीनच्या हाओ झी हिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह हिने कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्या हाओ झी हिची अँटी डोपिंग अधिकाऱ्याकडून चाचणी करण्यात येणार आहे आणि त्यात ती दोषी आढळल्यास तिच्याकडून सुवर्णपदक काढून घेतले जाईल.
Tokyo Olympics: Weightlifter Hou to be tested by anti-doping authorities, silver medallist Chanu stands chance to get medal upgrade
— ANI Digital (@ani_digital) July 26, 2021
Read @ANI Story | https://t.co/6dn9GPlA2e#OlympicGames#TokyoOlympicspic.twitter.com/dxJqZpxlux
''हाओ झी हिला टोकियोत राहण्यास सांगितले आहे आणि तिची टेस्ट केली जाणार आहे. टेस्ट केली जाणारच,''असे सूत्रांनी ANIला सांगितले. नियमानुसार जर खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला तर त्याला अपात्र ठरवून पदक काढून घेतले जाते. त्यानंतर ते पदक पुढील खेळाडूला दिले जाते.