पुढच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक निश्चित होईल; आयओसी सदस्य या नात्याने आयोजनाबाबत आशावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 12:23 AM2020-05-03T00:23:16+5:302020-05-03T00:23:35+5:30
जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी कोरोनावर लस येईपर्यंत ऑलिम्पिक होईल, याविषयी शंका तसेच चिंता व्यक्त केली.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर लस येईपर्यंत आॅलिम्पिक आयोजन होऊ शकेल का, यासंदर्भात मतभिन्नता असताना टोकियो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पुढच्या वर्षी ठरल्यानुसार २३ जुुलैपासून होतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य असलेले भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख नरिंदर बत्रा यांनी व्यक्त केला आहे.
जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी कोरोनावर लस येईपर्यंत ऑलिम्पिक होईल, याविषयी शंका तसेच चिंता व्यक्त केली. जपानच्या वैद्यकीय संघटनेच्या प्रमुखांनीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतरच ऑलिम्पिक शक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या समन्वय आयोगाचे प्रमुख जॉन कोटस यांनी मात्र कोरोना लस येईस्तोवर आॅलिम्पिक स्थगित करणे अनिवार्य नसल्याचे वक्तव्य केले आहे.
भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाच्या विशेष आॅनलाईन बैठकीला मार्गदर्शन करताना आयओए प्रमुख बत्रा यांनी शनिवारी कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नका, असे सांगून टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी निश्चितपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘मी विश्वसनीय सूत्रांच्या संपर्कात असून माझी नेहमी चर्चा सुरू आहे. आॅलिम्पिकचे आयोजन पुढच्या वर्षी होईल. माझ्या मते, कोरोनावर
सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत लस
निश्चितपणे येईल. आम्ही मात्र पुढील वर्षी आॅलिम्पिक आहे, त्याच पद्धतीने तयारी करणार आहोत. आंतरराष्टÑीय हॉकी महासंघाचे प्रमुख असलेले बत्रा म्हणाले,‘ २०३२ च्या आॅलिम्पिक दाव्यासाठी सर्व जुळवाजुळव सुरू झाली आहे. अंतिम निर्णय २०२५ ला होईल. आयओसीचे एक पथक विविध इच्छुक देशांचा दौरा करत आहे. डिसेबरमध्ये ते पुन्हा सुरू होईल, असे वाटते. (वृत्तसंस्था)
२०३२ च्या आॅलिम्पिक यजमानपदावर नजर
भारतीय आॅलिम्पिक संघटना २०३२ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या बोली प्रक्रियेत सहभागी होईल, असे बत्रा म्हणाले. भारताने राष्टÑकुलचे यजमानपद दहा वर्षांआधी यशस्वीपणे पार पाडले. त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आम्ही २०२६ चे यूथ आॅलिम्पिक गेम्स आणि २०२३ च्या आॅलिम्पिक आयोजनाबाबत गंभीर आहोत. या संदर्भात आयओसीला आधीही लिहिले आहे. २०२६ च्या आयोजनासाठी थायलंड, रशिया आणि कोलंबियासोबत स्पर्धा करावी लागेल. २०२३ च्या आॅलिम्पिक आयोजनासाठीदेखील क्वीन्सलॅन्ड (आॅस्ट्रेलिया), शांघाय आणि सेऊल तसेच प्यांगयांग या शहरांसोबत नवी दिल्लीची स्पर्धा असेल, असे बत्रा म्हणाले.