Tokyo Olympics: कुस्ती: बजरंग, विनेशकडून अपेक्षा, रवी दहिया देखील दावेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:32 AM2021-08-03T06:32:23+5:302021-08-03T06:34:15+5:30
Wrestling, Tokyo Olympics: भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.
टोकियो : भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. दोघांनी अलिकडे शानदार कामगिरी केल्यामुळे देशासाठी पदके जिंकू शकतात. आज मंगळवारी सोनम मलिकच्या लढतीद्वारे भारतीय आव्हानाला सुरुवात होईल. मल्लांनी येथे तीन पदके न जिंकल्यास भारताची खराब कामगिरी मानली जाईल.
बजरंग ६५ किलो फ्रीस्टाईल, विनेश ५३ किलो आणि रवी दहिया ५७ किलो प्रकारात लढत देणार आहे. १९ वर्षांची सोनम ६२ किलो गटात आव्हान सादर करेल. तिच्यापुढे आशियाई चॅम्पियनशिपची रौप्य विजेती मंगोलियाची बोलोरतुया खुरेलखूचे आव्हान असेल. दोघीही नवख्या खेळाडू असल्याने एकमेकींच्या डावपेचांची माहिती नाही.
विनेशच्या गटात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. विनेशचा बचाव आणि प्रतिहल्ला करण्याचे कौशल्य यामुळे ती प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय नोंदविण्यास सक्षम वाटते. बजरंग हा विश्व स्तरावरील सन्मानित मल्ल आहे. मागच्या दहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने सहा सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्य अशी कामगिरी केली. त्याचा दमखम चांगला आहे. पण लढताना पायाचा बचाव करणे हे मोठे आव्हान असेल.
रवी दहिया हा देखील तांत्रिकदृष्ट्या सक्षम मल्ल आहे. त्याला रशिया आणि तुर्कस्थानच्या मल्लांकडून आव्हान असेल. ८६ किलो फ्री स्टाईलमध्ये दीपक पुनिया देखील आव्हान सादर करणार असला तरी त्याची तयारी अर्धवट जाणवते.