टॉपर अँडी मरेचे ‘पॅकअप’
By admin | Published: January 23, 2017 12:30 AM2017-01-23T00:30:07+5:302017-01-23T00:30:07+5:30
काही दिवसांपूर्वीच बलाढ्य नोव्हाक जोकोविचला अनपेक्षितपणे आॅस्टे्रलियन ओपनमधून बाहेरचा रस्ता धरावा लागल्यानंतर
मेलबर्न : काही दिवसांपूर्वीच बलाढ्य नोव्हाक जोकोविचला अनपेक्षितपणे आॅस्टे्रलियन ओपनमधून बाहेरचा रस्ता धरावा लागल्यानंतर, जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ब्रिटनचा अँडी मरेलादेखील रविवारी आॅस्टे्रलियन ओपनमधून आपले ‘पॅकअप’ करावे लागले. जर्मनीचा मिशा ज्वेरेवने चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात मरेला नमवून खळबळ माजवली. त्याचवेळी दिग्गज रॉजर फेडररने आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये बुजूर्ग व्हीनस विल्यम्सने आपला जलवा दाखवताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत ५० व्या स्थानी असलेल्या ज्वेरेवने स्पर्धेतील सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवताना संभाव्य विजेत्या मरेला ७-५, ५-७, ६-२, ६-४ असे नमवले. विशेष म्हणजे, याआधी ज्वेरेवने जागतिक क्रमवारीतील द्वितीय खेळाडू नोव्हाक जोकोविचला धक्का देत त्याला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. यावरून त्याने जोकोविरुद्धचा विजय फ्ल्यूक नसल्याचे सिद्ध करतानाच आपला पुढचा प्रतिस्पर्धी दिग्गज फेडररला एकप्रकारे इशाराच दिला आहे.
विशेष म्हणजे, २००४ च्या फ्रेंच ओपननंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीआधीच अव्वल दोन खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचवेळी या दोन खळबळजनक निकालांचा फायदा घेण्यास फेडरर आणि राफेल नदाल सज्ज झाले आहेत. फेडरर साडेचार, तर नदाल अडीच वर्षांपासून ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत.
दुसरीकडे, १७ ग्रँडस्लॅम पटकावलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने जपानच्या केई निशिकोरीचे झुंजार आव्हान ५ सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात ६-७, ६-४, ६-१, ४-६, ६-३ असे परतावले. तब्बल ३ तास २४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात फेडने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारली. पुढच्या फेरीत त्याच्यापुढे जोको व मरेला धक्का देऊन ‘जायंट किलर’ ठरलेल्या ज्वेरेवचे आव्हान असेल.(वृत्तसंस्था)
पेस विजयी, सानिया पराभूत...
स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतीयांसाठी संमिश्र ठरला. मिश्र दुहेरीत एकीकडे दिग्गज खेळाडू लिएंडर पेसने मार्टिना हिंगीससह विजयी सलामी दिली, तर दुसरीकडे महिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात आले. पेसने स्वित्झर्लंडच्या हिंगीससह खेळताना डेस्टनी आयवा - मार्क पोल्मेन्स या आॅस्टे्रलियाई जोडीचा ६-४, ६-३ असा धुव्वा उडवला. पेस - हिंगीस यांनी केवळ ५१ मिनिटांमध्ये बाजी मारली. दुसरीकडे, सानिया आणि झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्टरीकोवाला तिसऱ्या फेरीत ई होजुमी - एम. कातो या जपानी जोडीविरुद्ध ३-६, ६-२, २-६ असा अनपेक्षित पराभव पत्करावा लागला.
अग्रमानांकित कर्बरही ‘आउट’
महिला गटात जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू एंजलिक कर्बरलाही अनपेक्षित पराभवासह स्पर्धेबाहेर जावे लागले.
अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात अमेरिकेच्या कोको वँडेवेघेने सरळ दोन सेटमध्ये कर्बरला ६-२, ६-३ असे लोळवून खळबळ माजवली.
पुरुष गटातून अव्वल दोन खेळाडू बाद झाल्यानंतर महिला गटातही अव्वल खेळाडूचे आव्हान संपुष्टात आले आहे.
महाराष्ट्राच्या महिका यादवने आॅस्टे्रलियन ओपनमध्ये मुलींच्या ज्युनिअर गटात विजयी सलामी देताना ब्रिटनच्या अली कॉलिन्सचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-४ असा पाडाव केला. त्याचप्रमाणे मुलांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्याच सिद्धांत बांठियाने तुर्कस्थानच्या काया गोरेसह खेळताना विजयी सुरुवात केली. बांठिया - गोरे यांनी फेड्रिको आयनाकोन (इटली) - आयेन शुतेन (नेदरलँड) यांचा ६-७ (४), ११-९ असा पराभव केला.