विश्वचषक स्वयंसेवक उपक्रमासाठी तुफान प्रतिसाद
By admin | Published: April 5, 2017 12:11 AM2017-04-05T00:11:33+5:302017-04-05T00:11:33+5:30
फीफाच्या मुख्य स्पर्धेचे प्रथमच यजमानपद सांभाळत असलेल्या भारतात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे
रोहित नाईक,
मुंबई- फीफाच्या मुख्य स्पर्धेचे प्रथमच यजमानपद सांभाळत असलेल्या भारतात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या फुटबॉलप्रेमींमध्येही मोठी उत्सुकता असून आतापर्यंत जगभरातून तब्बल २० हजाराहून अधिक लोकांनी फीफा स्वयंसेवक मोहिमेमध्ये नोंदणी केली आहे.
विश्वचषक फुटबॉलसारख्या जागतिक स्पर्धेच्या आयोजनामध्ये काम करण्याची संधी सर्वसामान्य क्रीडाप्रेमींना मिळावी, यासाठी फीफाने आॅलिम्पिकच्या धर्तीवर स्वयंसेवक उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमासाठी जगभरातील ६८ देशांतून सुमारे २० हजार २०० लोकांनी स्वयंसेवक म्हणून अर्ज केले असल्याची माहिती, स्पर्धा आयोजकांनी ‘लोकमत’ला दिली.
विशेष म्हणजे, या उपक्रमामध्ये एकट्या भारतातून सर्वाधिक ८ हजार १५६ अर्ज आले आहेत. त्यातही दिल्लीकरांचे अर्ज सर्वाधिक असून त्यानंतर मुंबईकर आणि कोलकाताच्या क्रीडाप्रेमींचा क्रमांक आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत आलेल्या एकूण अर्जांपैकी ६०% अर्ज १८ - २२ या वयोगटातील स्वयंसेवकांचे असून सर्वाधिक वयस्कर स्वयंसेवक म्हणून गोव्याच्या एका ७२ वर्षीय व्यक्तीने अर्ज केला आहे.
त्याचबरोबर, या अर्जदारांमध्ये महिलांचाही मोठा सहभाग असून एकूण अर्जदारांपैकी १४००हून अधिक महिला आहेत. या सर्व स्वयंसेवकांवर स्पर्धा आयोजनाच्या प्रमुख जबाबदारी सोपविण्यात येतील. यामध्ये व्यवस्थापन, मार्केटिंग आॅपरेशन, अॅक्रिडिएशन आणि आयटी यासारख्या जबाबदारी स्वयंसेवकांवर असतील.
>स्वयंसेवक उपक्रमाला मिळालेला तुफान प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. आमच्याकडे आतापर्यंत २० हजाराहून अधिक अर्ज आले असून ही संख्या आणखी वाढेल यात शंका नाही. यातून एक गोष्ट नक्की होत आहे की, भारतात होत असलेल्या या स्पर्धेची माहिती जगभरातील फुटबॉलप्रेमींना असून ते आपला वेळ देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या स्वयंसेवकांच्या सहभागामुळे ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल.
- जेविअर सेप्पी, स्पर्धा संचालक
महत्त्वाचे मुद्दे..
स्वयंसेवक उपक्रम जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ८ हजार १५६ अर्जदारांनी नोंदणी केली.
जगभरातील ६८ देशांतील स्वयंसेवकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
नोंदणी झालेल्या अर्जदारांना विविध ३४ भाषांचे ज्ञान असून यामध्ये भारताच्या अधिकृत १९ भाषांचा समावेश आहे.
कोचीसाठी ७ हजार ९३५ अर्ज दाखल झाले.
जवळपास अर्ध्याहून अधिक स्वयंसेवक अनुभवी आहेत.कोची येथे होणाऱ्या सामन्यांसाठी स्वयंसेवकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.