सरावादरम्यान मानेतून आरपार गेला बाण, थोडक्यात बचावली १४ वर्षीय तिरंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:10 AM2017-10-31T00:10:52+5:302017-10-31T00:11:11+5:30
भारतीय क्रीडा प्राधिकरणची (बोलपूर) एक १४ वर्षीय तिरंदाज थोडक्यात बचावली. कारण सोमवारी सकाळच्या सराव सत्रादरम्यान एक बाण तिच्या मानेच्या उजव्या भागातून आरपार शिरला.
कोलकाता : भारतीय क्रीडा प्राधिकरणची (बोलपूर) एक १४ वर्षीय तिरंदाज थोडक्यात बचावली. कारण सोमवारी सकाळच्या सराव सत्रादरम्यान एक बाण तिच्या मानेच्या उजव्या भागातून आरपार शिरला.
साईचे विभागीय संचालक एम.एस. गोइंडी यांनी हा अपघात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘तिरंदाज फाजिला खातूनच्या मानेतून बाण आरपार गेला. तिच्यावर रुग्णायलात उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर आहे.’
गोइंडी पुढे म्हणाले,‘एक बाण तिच्या मानेतून आर-पार गेला, पण सुदैवाने तिच्या श्वसननलिकेला इजा झाली नाही. आता तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.’ अहवालानुसार सहकारी तिरंदाज ज्वेल शेखच्या चुकीने सुटलेला बाण फाजिलाला लागला. व्हिडीओमध्ये फाजिला रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. गोइंडी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देताना म्हटले की,‘लक्ष्य साधताना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यावेळी तिरंदाज बाण गोळा करण्यासाठी जातात त्यावेळी नेम साधण्यास बंदी घालण्यात आली आहे. तिरंदाज आपल्या स्थानावर परत आल्यानंतरच नेम साधाण्याची सूचना देण्यात आली आहे, तरी हे कसे घडले, याची मला कल्पना नाही. भविष्यात असे घडणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.’
गोइंडी म्हणाले,‘सर्व प्रशिक्षक यासाठी जबाबदार आहेत. मी पूर्ण चौकशी करणार असून, आमच्याकडून कुठली चूक होणार नाही. भविष्यात अशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. कदाचित प्रशिक्षण स्टाफकडून चूक झाली असावी. कारण एकदा एका सेटचा सराव झाल्यानंतर कुणी लक्ष्याचा वेध घेणार नाही, अशी घोषणा करण्यात येते.’ फाजिला रिकर्वची युवा तिरंदाज आहे. जुलैमध्ये जिल्हा स्पर्धेतील कामगिरीनुसार निवड झालेल्या २३ प्रशिक्षणार्थी तिरंदाजांमध्ये तिचा समावेश आहे. ती पुढील महिन्यात आयोजित आंतर साई स्पर्धेसाठी तयारी करीत होती.