शालेय क्रीडा प्रकारात एकूण ५१ विविध क्रीडाप्रकारांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 05:51 AM2018-09-29T05:51:52+5:302018-09-29T05:52:20+5:30
भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे.
- सचिन भोसले
कोल्हापूर - भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे. त्यामुळे शालेय क्रीडा प्रकारांची आता एकूण संख्या ५१ इतकी झाली आहे.
विविध खेळांत अनेक भारतीय खेळाडूंनी जगभरात देशाचा नावलौकिक करावा. त्यातून खेळ आणि आरोग्य उत्तम राहावे. देशाची पिढी सुदृढ व्हावी. याकरिता केंद्र शासनाच्या भारतीय खेळ महासंघाने देशी खेळांसह परदेशी खेळांचाही यंदापासूनच्या शैक्षणिक वर्षात केला आहे. यात विशेष म्हणजे आट्यापाट्या हा खेळ बहुतेक मुलांच्या विस्मरणात गेला होता. त्यास पुनरुज्जीवन मिळावे म्हणून भारतीय खेल महासंघाने त्याचा पुन्हा शालेय क्रीडा प्रकारात समावेश केला आहे. यासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन या विदेशी खेळाचाही समावेश केला आहे.
यासंबंधीचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना गेल्या महिनाभर राज्या-राज्यातील क्रीडा व युवक सेवा संचलनालये करीत आहेत. कोल्हापुरातही अशा प्रकारची कार्यशाळा नुकतीच जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आली. यात या खेळांचे आंतरराष्ट्रीय नियम, खेळाडूंची संख्या, मैदान, रिंग, आदींची तांत्रिक माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.
नव्या व जुन्या खेळांची सांगड घालून चांगली सुदृढ पिढी घडावी. त्यातून चांगले खेळाडू राष्ट्राला मिळावेत. या उद्देशाने भारतीय खेळ महासंघ व राज्य क्रीडा व युवा संचलनालयाने नव्या सहा खेळांचा यंदापासून समावेश केला आहे.
- चंद्रशेखर साखरे,
जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर