ऑल इंग्लंडमध्ये भारतीयांना खडतर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 08:56 AM2023-03-14T08:56:13+5:302023-03-14T08:56:55+5:30
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला १५ मार्चपासून सुरुवात होत आहे.
अभिजित देशमुख, थेट बर्मिंघमवरून
बर्मिंघम : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला १५ मार्चपासून सुरुवात होत आहे. भारताचे १५ खेळाडू स्पर्धेत आव्हान सादर करणार आहेत. मात्र, जेतेपदाचा मार्ग सोपा दिसत नाही. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन सामने याच ठिकाणी झाले होते. त्यावेळी भारताने दहा पदके जिंकली. सिंधूने महिला आणि लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्ण तर सात्विक-चिराग जोडीने पुरुष दुहेरीच्या सुवर्णावर नाव कोरले. इतरही खेळाडूंनी पदके जिंकून दिली होती.
१९८० ला प्रकाश पदुकोण आणि २००१ला पुलेला गोपीचंद यांनी जेतेपद पटकविल्यानंतर २२ वर्षे भारताला प्रतीक्षा करावी लागत आहे. लक्ष्य सेन मागच्या सत्रात तर सायना नेहवाल २०१५ ला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाले होते. दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूला मात्र स्पर्धेत उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेला सेन आणि सिंधू दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून कोर्टबाहेर आहेत.
स्पर्धेतील भारतीय
महिला एकेरी : पी.व्ही. सिंधू, सानया नेहवाल. पुरुष एकेरी : लक्ष्य सेन, एच.एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत. पुरुष दुहेरी : चिराग शेट्टी- सात्विक साईराज रंकिरेड्डी. एम.आर. अर्जुन- ध्रुव कपिल. महिला दुहेरी : गायत्री गोपीचंद- त्रिशा जॉली, अश्विनी भट- शिखा गौतम. मिश्र दुहेरी : इशान भटनागर- तनिशा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"