गोवा पर्यटनाला ग्रॅण्डमास्टर स्पर्धेचे ‘बळ’; २७ देशांतील बुद्धिबळपटू गोव्यात खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:56 AM2018-10-11T01:56:54+5:302018-10-11T02:04:52+5:30
सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुद्धा गोवा पर्यटनाला ‘बुस्ट’ देणारी ठरेल.
- सचिन कोरडे
पणजी : सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुद्धा गोवा पर्यटनाला ‘बुस्ट’ देणारी ठरेल. कारण, या स्पर्धेच्या निमित्ताने २७ देशांतील खेळाडू गोव्यात दाखल होतील. या खेळाडूंसाठी गेल्या महिन्याभरापूर्वी सात-आठ मोठी हॉटेल्स बुकिंग करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना हॉटेल्स मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गोवा हे पर्यटकांबरोबरच खेळाडूंनाही आकर्षित करते. प्रत्येक खेळाडूला गोव्यात खेळण्याची इच्छा असते. कारण त्यांना गोव्यात खेळाबरोबरच पर्यटनाचाही आनंद लुटण्याची संधी मिळते. त्यामुळे पहिल्यांदाच या स्पर्धेला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून याचे गोवा बुद्धिबळ संघटनेलाही आश्चर्य वाटत आहे. ‘या स्पर्धेला सरकारने पूर्ण पाठींबा दिल्याने आमच्या अडचणी दूर झाल्यात. स्पर्धेचा प्रतिसाद पाहता आम्ही सुद्धा चकीत झालो,’ असे गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर १३ ते २० आक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत २१ देशांचे एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. त्यात २२ आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स असतील. स्पर्धा तीन गटांत होईल. त्यात एलिट गटात २६० तर ‘ब’ आणि ‘क’ गटात एकूण ९०० प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. खेळाडूंसाठी निवास, भोजन आणि प्रवास यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, गोव्यात २००२ मध्ये विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर आायेजित केलेली ही ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धा आहे.
आॅलिम्पिकसाठी प्रस्ताव
बुद्धिबळ या खेळाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश व्हावा,यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जॉर्जिया येथे
सुरु असलेल्या चेस आॅलिम्पियाडमध्ये १८६ देशांतील ४ हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे आॅलिम्पिक प्रवेशाचे द्वार खुले असल्याचे किशोर बांदेकर यांनी सांगितले.
बक्षिसांची खैरात होणार
एकूण ३४ लाखांची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेच्या एलिट गटातील विजेत्यास २.५ लाख रुपये, उपविजेत्यास २ लाख रुपये तिसºया, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडू अनुक्रमे १ लाख, ८५ हजार आणि ७५ हजार रुपये देण्यात येतील.
पहिल्या ४० खेळाडूंना रोख बक्षिसे देण्यात येतील. ‘ब’ गट विजेत्यास १ लाख ४० हजार रुपये, उपविजेत्यास १ लाख १५ हजार रुपये दिले जातील. ‘क’ गटातील विजेत्यास १ लाख २५ हजार रुपये व उपविजेत्यास १ लाख रुपये दिले जातील. याशिवाय इतर वैयक्तिक बक्षिसेही असतील.