पाहुण्या संघाकडे उत्तर नाही : स्मिथ
By admin | Published: December 28, 2014 12:58 AM2014-12-28T00:58:34+5:302014-12-28T00:58:34+5:30
यजमान संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ५३० धावांची दमदार मजल मारली, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने व्यक्त केली.
मेलबोर्न : भारताकडे आॅस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांविरुद्ध कुठली योजना नाही, त्यामुळे यजमान संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ५३० धावांची दमदार मजल मारली, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने व्यक्त केली.
कारकीर्दीतील सर्वोत्तम १९२ धावांची खेळी करणारा स्मिथ म्हणाला, ‘खेळपट्टीवरच तळ ठोकल्यामुळे आनंद झाला आणि सर्व बाबी माझ्यासाठी अनुकूल होत्या. आम्हाला ५३० धावांची दमदार मजल मारता आली, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. पहिल्या डावात ही चांगली धावसंख्या आहे.’
स्मिथने ब्रॅड हॅडिनच्या (५५) साथीने सहाव्या विकेटसाठी ११०, रॅन हॅरिससोबत (७४) आठव्या विकेटसाठी १०६ धावांची आणि नॅथन लियोनसोबत नवव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.स्मिथ म्हणाला, ‘आमच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. खेळपट्टीवर दाखल झाल्यानंतर त्यांनी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मिशेल जॉन्सन आजही चांगला खेळत होता तर रॅन हॅरिसने शानदार फलंदाजी केली. भारताकडे आम्हाला रोखण्याचे उत्तर नव्हते. आमचे तळाचे फलंदाज चांगली कामगिरी करीत असल्यामुळे निश्चितच आनंद झाला. प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला.’
स्मिथने यष्टिरक्षक हॅडिनची प्रशंसा करताना सांगितले ‘ब्रॅडने चांगली फलंदाजी केली. तो गोलंदाजावर वर्चस्व गाजवत होता. तो आज सुरुवातीपासून सकारात्मक होता. त्याने आखूड टप्प्याचा मारा चांगल्याप्रकारे खेळून काढला.’
स्मिथचे द्विशतक हुकले असले तरी त्याला त्याचा खेद वाटत नाही. स्मिथ म्हणाला, ‘संघासाठी जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न करीत होतो. मी चहापानाच्या विश्रांतीला डाव घोषित करण्यास उत्सुक होतो, त्यामुळे अधिक धावा फटकाविण्यासाठी प्रयत्नशील होतो. माझ्या मते, ५३० ही चांगली धावसंख्या आहे.’ भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद १०८ धावांची मजल मारली. स्मिथ पुढे म्हणाला, ‘आम्ही आज प्रतिस्पर्धी संघाचे काही बळी घेण्यात यशस्वी ठरलो असतो तर आनंद झाला असता. सकाळच्या सत्रात प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास प्रयत्नशील आहोत.’ (वृत्तसंस्था)