ताम्हिणी घाटातील ट्रेकमुळे विराटसेनेची गाडी ट्रॅकवर
By Admin | Published: March 7, 2017 05:43 PM2017-03-07T17:43:23+5:302017-03-07T18:05:15+5:30
भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाच झाला, असे म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला
नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. 7 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गेल्या दहा महिन्यात भारतीय संघाने विरोधी संघावर हुकूमत गाजवताना निर्विवाद वर्चस्व राखले होते. पण ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ रोखण्यासाठी खेळपट्टी आणि खेळाडूंचा महिनाभर अभ्यास करून तगडे आव्हान दिले आहे. 19 कसोटी सामन्यानंतर पुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात 333 धावांच्या माणहानीकारक पराभवाला भारताला सामोर जावे लागले होते.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीतील कात्रजचा घाट दाखवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी विराट सेनेला घेऊन थेट ताम्हिणी घाट गाठला होता. विजय मिळवण्यासाठी दडपण न घेता नॅचरल खेळ करण्यावर जम्बो उर्फ कुंबळेचा भर आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात सर्व संघासह मनसोक्त ट्रेकिंग केले. गेल्या 18 महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने यानिमित्तानं सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आपला शिणवटा घालवला. खऱ्या अर्थाने भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाट झाला म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. बंगळुरू कसोटीत विजयी पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाने सर्व प्रकारे तयारी केली होती. संयम कधी बाळगावा आणि आक्रमकपणा कधी आणावा तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भारताने ताम्हिणी घाटात ट्रेकही केला होता.
पुण्यातील विजयानंतर बंगळुरू कसोटीमध्ये पाहुण्या संघ मनोधैर्यासह मैदानात उतरला होता. पहिल्या डावात त्यांनी आघाडी घेत दुसरी कसोटी खिशात घालणार,असे वाटत होते. पण सांघिक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने विजयश्री खेचून आणला. ताम्हिणी घाटातील ट्रेकिंग नंतर कोहली अँड कंपनीने पुण्यातील कामगिरीबाबत अधिक विचार न करता बेंगळुरू कसोटीत चमकदार कामगिरी करत कसोटीतील आपली बादशाहत कायम ठेवली आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 बरोबरी करत बॉर्डर-गावस्कर चषकात रोमांचकता वाढवली आहे.
या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे मनोधैर्य नक्कीच वाढले असेल. यानंतर भारतीय संघाने खेळावर आणि आपल्या कामगिरीवर अधिक चांगली करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ते करण्यासाठी मनात कुठेही किंतु परंतु नको. निराशा व राग यामुळे भारतीय संघाची कामगिरी भरकटू शकते. ताम्हिणी घाटातील ट्रेकनंतर भारतीय संघाचे मनोबल, आत्मविश्वास उंचावलेला आहे, पुढच्या दोन कसोटी सामन्यात भारताने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखायला हवे. पाहुण्या संघाविरुद्ध आगामी दोन्ही कसोटी सामन्यत भारताने निर्विवाद वर्चस्व राखल्यास ताम्हिणी घाटाच्या ट्रेकमुळे संघातील खेळाडू ट्रॅकवर आले, असेच म्हणावे लागेल.
दोन कसोटीमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन संघानी केलेल्या तयारीकडे डोळेझाक करू शकत नाही. ऑस्ट्रेलियन संघाने दुबईमध्ये सराव केला. त्यांना येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. पुणे आणि बंगळुरू कसोटी सामन्यात त्याची प्रचिती आली. पाहुण्या संघाची फलंदाजी मजबूत भासत आहे.
रांची कसोटीमध्ये भारतीय संघाला पहिल्या चेंडूपासून विजयाचा निर्धार दाखवावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूवर हल्लाबोल करावा लागणार आहे. पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाची देहबोली निराशाजनक होती. ओकिफ आणि लायनविरुद्ध परंपरागत दृष्टिकोन राखून खेळण्याचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. त्यांच्याविरोधात आक्रमकपणे खेळण्यावर भर द्यावा लागेल. जोपर्यंत भारतीय संघ नंबर वन प्रमाणे क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत पाहुणा संघ भरतावर वर्चस्व गाजवू शकतो.