तिरंगा सोबत नसणार याचे दु:ख
By admin | Published: May 31, 2016 03:49 AM2016-05-31T03:49:48+5:302016-05-31T03:49:48+5:30
आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. परंतु, या वेळी अशी संधी भारतीय बॉक्सर्सला मिळणार नसल्याचे जास्त दु:ख आहे.
मुंबई : आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. परंतु, या वेळी अशी संधी भारतीय बॉक्सर्सला मिळणार नसल्याचे जास्त दु:ख आहे. मात्र, तरीही आम्ही सकारात्मक खेळ करून पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी खंत आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या एकमेव भारतीय बॉक्सर शिव थापा याने व्यक्त केली.
सोमवारी, मुंबईत झालेल्या आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (ओजीक्यू) कार्यक्रमदरम्यान थापा याने आपले मत मांडले. आॅलिम्पिकच्या पूर्वतयारीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात या वेळी थापासह, हिना सिद्धू, पी. व्ही. सिंधू, जीतू राय, चैन सिंग, आयोनिक पॉल, पूर्वी चंदेला, गुरप्रीत सिंग आणि प्रकाश नंजप्पा या आॅलिम्पिक पात्रता मिळवलेल्या खेळाडूंचीही उपस्थिती होती.
सध्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने (आयबा) भारतीय बॉक्सिंग संघटनेला अपात्र केले असल्याने भारतीय बॉक्सर्सना रिओ आॅलिम्पिकमध्ये आयबाच्या ध्वजाखाली सहभागी व्हावे लागणार आहे. संघटनेच्या वादाविषयी विचारलेल्या प्रश्नावर थापा म्हणाला, ‘‘वैयक्तिकरीत्या मी आॅलिम्पिकसाठी खूप मेहनत घेतली आहे. एक खेळाडू म्हणून संघटनेच्या वादाविषयी मी जास्त विचार केलेला नाही. त्याचा माझ्या खेळावरही परिणाम होऊ दिला नाही. पण, आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होताना भारताच्या ध्वजाखाली खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. कारण हीच एक बाब सर्वाधिक आत्मविश्वास मिळवून देते. त्यामुळेच जेव्हा मी आशियाई स्पर्धेत सुवर्ण पटकावले तेव्हा भारताच्या ऐवजी आयबाचा झेंडा फडकल्यानंतर थोडा दु:खी होतो.’’ ‘‘त्याचप्रमाणे भारताच्या ध्वजासह खेळता येणार नसल्याचे दु:ख आहे.