टीम इंडियासाठी प्रशिक्षकाचा शोध सुरू
By admin | Published: January 8, 2015 01:29 AM2015-01-08T01:29:38+5:302015-01-08T01:29:38+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपनंतर डंकन फ्लेचर यांच्या जागी टीम इंडियासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे़
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपनंतर डंकन फ्लेचर यांच्या जागी टीम इंडियासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे़
बीसीसीआच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी काही लोकांशी सध्या चर्चा सुरू आहे; तसेच त्यासाठी आम्ही काही वरिष्ठ खेळाडूंचाही सल्ला घेत आहोत़
फ्लेचर यांचा करार वन-डे वर्ल्डकपनंतर संपुष्टात येत आहे़ आपल्या पूर्ण कार्यकाळात फ्लेचर यांचे माजी कसोटी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत चांगले संबध होते़ मात्र, रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या संचालकपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून फ्लेचर यांना विशेष महत्त्व देण्यात येत नव्हते़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लेचर यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीच्या प्रकृतीचे कारण पुढे करून प्रशिक्षकपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती़ मात्र, बीसीसीआयने वर्ल्डकप व अन्य महत्त्वपूर्ण स्पर्धांमुळे त्यांना रोखले होते़ (क्रीडा प्रतिनिधी)