ट्रान्सजेंडर महिला बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यास बंदी; फिडेचा निर्णय, वाद उद्भवण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 09:03 AM2023-08-19T09:03:47+5:302023-08-19T09:04:00+5:30
सहभागास परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे फिडेने सांगितले.
जिनेव्हा: जागतिक बुद्धिबळातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘फिडे’ने लिंग परिवर्तन करीत पुरुषांपासून महिला बनलेल्या बुद्धिबळपटूंवर स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. आमचे अधिकारी लिंग परिवर्तनाची समीक्षा करेपर्यंत ट्रान्सजेंडर महिलांना स्पर्धेत मज्जाव असेल, असे ‘फिडे’ने शुक्रवारी स्पष्ट केले.
‘फिडे’च्या या निर्णयावर ट्रान्सजेंडरच्या अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या पाठीराख्यांनी कठोर शब्दांत टीका केली. दुसरीकडे, फिडेचे सदस्य असलेल्या महासंघांकडून ट्रान्सजेंडरला स्पर्धेत खेळू देण्याची विनंती केली जात आहे. या महिलांच्या सहभागास परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे फिडेने सांगितले.
‘लिंग परिवर्तनामुळे खेळाडूची स्थिती आणि स्पर्धेत सहभागी होण्याच्या पात्रतेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लिंग परिवर्तनाचे प्रासंगिक आणि ठोस कारण उपलब्ध असेल तरच अशा खेळाडूंना परवानगी देणे शक्य होऊ शकेल.
कुणीही स्वमर्जीने लिंग परिवर्तन करीत पुरुषापासून महिला बनले असेल तर फिडेच्या पुढील निर्णयापर्यंत अशा महिला खेळाडूला बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होता येणार नाही,’ असे फिडने म्हटले आहे.
पुरुषांसाठी नियम
फिङेने म्हटले की, एखादी महिला खेळाडू लिंग परिवर्तन करीत पुरुष बनला असेल तर त्या महिलेचे आधीचे सर्व पुरस्कार आणि रेटिंग काढून घेतले जातील. याउलट एखादा पुरुष लिंग परिवर्तनाद्वारे महिला बनली असेल तर त्या पुरुष खेळाडूचे आधीचे पुरस्कार आणि रेटिंग कायम ठेवले जातील.