साठीतही जपलाय ऑलिम्पिक संग्रहाचा खजिना; रूपकिशोर कनोजिया यांच्याकडे आठवणींचा ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:44 AM2021-07-25T08:44:38+5:302021-07-25T08:45:21+5:30
कनोजिया हे नागपुरातील संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. थोर, महान व्यक्तींबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडे भरपूर संग्रह आहे.
मंगेश व्यवहारे
नागपूर : सध्या टोकियो ऑलिम्पिककडे जगाच्या नजरा आहेत. नागपुरातील महाल भागात राहणाऱ्या रूपकिशोर कनोजिया यांच्याकडे असलेला ऑलिम्पिकशी संबंधित संग्रह लक्ष वेधून घेतोय. विविध नाणी, डाक तिकिटे, फर्स्ट डे कव्हर आदी खजिना त्यांच्या छोट्याशा कौलारू घराला मौल्यवान बनवतो. याशिवाय त्यांच्याकडील ऑलिम्पिकशी संदर्भातील घटना, आठवणींचा ठेवा त्यांच्या या संग्रहीवृत्तीला आणखी समृद्ध बनवतो. कनोजिया हे नागपुरातील संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. थोर, महान व्यक्तींबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडे भरपूर संग्रह आहे.
रोचक आठवणी मुखोद्गत
ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली, सर्वाधिक ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देशाने केले, काही वर्षी ऑलिम्पिक का झाले नाही, हिटलरने मेजर ध्यानचंदबद्दल व्यक्त काढलेले कौतुकोद्गार, भारताचे पहिले पदक, भारतीय महिला खेळाडूने मिळविलेले पहिले पदक, आतापर्यंत भारताची पदतालिका अशा अनेक गोष्टी, किस्से, रोचक आठवणी त्यांना मुखोद्गत आहेत.
विविध वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असल्याने, ऑलिम्पिकशी निगडित साहित्यसुद्धा मिळाले. खेळात रुची असल्याने ऑलिम्पिकची दुर्मिळ माहिती गोळा करीत गेलो. त्यातून हा संग्रह जमला. हा दुर्लभ खजिना आपल्याजवळ असल्याचा आनंद आहे. - रूपकिशोर कनोजिया, संग्राहक
रूपकिशोर हे सुरूवातीला मिलमध्ये कामगार होते. मिल बंद पडल्यानंतर त्यांनी सूतिकागृहात काम केले. पण संग्रहाचा छंद सोडला नाही. आज ते ६० वर्षांचे आहेत.