LOKMAT.COM Exclusive : तिरंगा फडकला... राष्ट्रगीताची धून वाजली... आणि अभिमानानं उर भरून आला; सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतने व्यक्त केल्या भावना
By प्रसाद लाड | Published: April 13, 2018 05:31 PM2018-04-13T17:31:10+5:302018-04-13T17:31:10+5:30
राष्ट्रगीताच्या वेळी लोकं उभी राहीली, तेव्हा अभिमान वाटला. माझ्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले जाणे, या सारखा आनंद जगात कुठलाच नाही, असे तेजस्विनीने सांगितले.
प्रसाद लाड : सुवर्णपदक जिंकल्यावर मी पोडीयमवर उभी होते... तिरंगा डोळ्यासमोरुन वर चढत होता... राष्ट्रगीताची धून सुरु झाली आणि सारेच मानवंदना देण्यासाठी उभे राहीले... त्यावेळी जो उर भरून आला तो शब्दांत व्यक्त करता येणार नाही, अशी भावना गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने खास मुलाखतीमध्ये केली. तेजस्विनीने शुक्रवारी ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत अव्वल स्थानासह सुवर्णपदक पटकावले.
गुरुवारी तेजस्विनीने ५० मी. प्रोन रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली होती. ही तिची राष्ट्रकुल स्पर्धेतील हॅट्ट्रिक ठरली. कारण मेलबर्नला झालेल्या 10 मी. एअर रायफल पेअर प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर 10 मी. एअर रायफल प्रकारात पुन्हा एकदा तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या स्पर्धेत तेजस्विनीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती, पण या स्पर्धेत तिने दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर या स्पर्धेत उतरल्यावर तिचे सुवर्णपदक गुरुवारी हुकले होते. पण तिने जिद्द सोडली नाही आणि सुवर्णपदक पटकावले.
सुवर्णपदक पटकावल्यावर तेजस्विनी म्हणाली की, " सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहेच. पण त्यापेक्षा जास्त आनंद आपण भारतासाठी काही तरी करू शकलो, याचा आहे. कारण जेव्हा राष्ट्रगीताच्या वेळी लोकं उभी राहीली, तेव्हा अभिमान वाटला. माझ्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले जाणे, या सारखा आनंद जगात कुठलाच नाही. "
तेजस्विनीच्या आईलाही वाटला अभिमान
आपल्या मुलीने देशासाठी पदक पटकावले, हे समजल्यावर तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तेजस्विनीने पदक जिंकल्यावर सुनीता म्हणाल्या की, " तेजस्विनीने सलग तिसऱ्या स्पर्धेत भारतासाठी पदक पटकावले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तिची सोनेरी कामगिरी पाहून मला अतीव आनंद झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुहिली गांगुली यांच्याकडे तेजस्विनी मार्गदर्शन घेत होती. त्यांच्याही या यशात मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर लग्नानंतरही तेजस्विनीला नेमबाजी खेळू देणारे तिचे पती समीर दरेकर आणि सासरच्या मंडळींचा पाठिंबाही महत्वाचा आहे. "