रिओ पॅरालिम्पिकमध्ये झांझरियाने उंचावला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2016 12:30 AM2016-09-09T00:30:04+5:302016-09-09T00:30:04+5:30
दिव्यांग खेळाडूंच्या कौशल्याचे जागतिक व्यासपीठ असलेल्या पॅरालिम्पिकला बुधवारी रात्री ब्राझीलच्या रिओ शहरात शानदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली.
रिओ : दिव्यांग खेळाडूंच्या कौशल्याचे जागतिक व्यासपीठ असलेल्या पॅरालिम्पिकला बुधवारी रात्री ब्राझीलच्या रिओ शहरात शानदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. १५९ देशांच्या ४,३४२ पॅराखेळाडूंचे दिमाखदार पथसंचलन, नेत्रदीपक आतषबाजी, सांबा नृत्य तसेच ब्राझीलच्या संस्कृतीची झलक हे उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. पॅरालिम्पिकमध्ये एकूण २३ स्पर्धा प्रकार होणार आहेत.
२००४च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा देवेंद्र झांझरिया याने १९ सदस्यांच्या भारतीय पथकाचे नेतृत्व करून तिरंगा उंचावला. २१ आॅगस्ट रोजी रिओ आॅलिम्पिकचा यशस्वी समारोप झाल्यानंतर मराकाना स्टेडियम
काल पुन्हा एकदा झळाळून निघाले. सांबा कलावंतांनी सादर केलेल्या नृत्यांची मेजवानी उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या स्मृतिपटलावर कायमसाठी कोरली गेली.
ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा लवलेशदेखील पॅरालिम्पिक आयोजनावर जाणवला नाही. अर्थात, देशात स्थानिक रहिवाशांकडून मात्र सरकारला विरोधाचा सामना करावा लागत आहे.
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात क्रीडाज्योत प्रज्वलनाद्वारे झाली. ब्राझीलची राजधानी ब्रासिलिया, ही बेलेन, नटाल, साओ पावलो तसेच जॉईनव्हिले आदी शहरांतून आलेल्या पाच मशाली तसेच पॅरालिम्पिकचा उगम
झालेल्या ब्रिटनमधील स्टोक मांडव्हिले येथून आलेल्या सहाव्या मशालीच्या साह्याने क्रीडाज्योतीचे प्रज्वलन झाले.
आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे (आयपीसी)अध्यक्ष फिलिप क्रॉवेन यांनी खेळाडूंना संबोधित करताना पॅरालिम्पिक केवळ ४ वर्षांच्या सरावाचा परिणाम नसून खेळांंप्रति दिव्यांग खेळाडूंचा आजीवन संघर्ष आणि त्यांच्या समर्पित वृत्तीचा सुंदर संगम असल्याची भावना व्यक्त केली. पॅरालिम्पिकच्या निमित्ताने गुगलने विशेष डुडल तयार केले आहे. स्पर्धास्थळी हे डुडल लक्षवेधी ठरले.