भारताचा ट्रिपल धमाका
By Admin | Published: August 1, 2014 05:54 AM2014-08-01T05:54:45+5:302014-08-01T05:54:45+5:30
आॅलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त याने २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात गुरुवारी सुवर्णमय कामगिरी केली
ग्लास्गो : आॅलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त याने २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात गुरुवारी सुवर्णमय कामगिरी केली. याशिवाय महिला मल्ल बबिता कुमारी हिने देखील ५५ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. ६३ किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये भारताच्या गितिकाने रौप्य पदक मिळविले. तिला कॅनडाच्या डॅनी लाप्पेज हिने अंतिम फेरीत पराभूत केले. अगरतळाची २० वर्षांची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमधील वॉल्टच्या अंतिम लढतीत १४.३६६ गुण नोंदवित कांस्य पदक मिळविले. ८६ किलो फ्रिस्टाईलमध्ये पवनकुमारने पाकिस्तानच्या मोहम्मद इनाम याला हरवून कांस्य पदक पटकाविले.
योगेश्वरने अंतिम लढतीत कॅनडाचा जेव्होन बालफोर याला चारीमुंड्या चित केले तर बबिताने कॅनडाची ब्रिटनी लावेरदूरे हिला एकतर्फी ९-२ अशा गुण फरकाने नमविले. २४ वर्षांच्या बबिताने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजविले. पहिल्या फेरीत तिने पाच तर दुसऱ्या फेरीत चार गुणांची कमाई केली. दरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूनेही दोन गुण संपादन केले. प्रत्युत्तर म्हणून बबिताने नवे डावपेच लढवून आणखी दोन मिळविताच पंचांनी ९-२ अशा बबिताला विजयी घोषित केले.