ट्रिपल महाराष्ट्र केसरी अन् पुणे SP विजय चौधरी विश्व विजेते; भारताल 'गोल्ड'
By विवेक भुसे | Published: July 30, 2023 10:29 AM2023-07-30T10:29:43+5:302023-07-30T12:08:00+5:30
वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये कुस्तीत भारताला सुवर्णपदक
विवेक भुसे
पुणे : कुस्तीमधील महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू, तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते आणि अपर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी कॅनडा येथील वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. कॅनडामधील विणीपेग येथे वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स ही जागतिक स्तरावरील पोलिस दलाची स्पर्धा सुरु आहे. पोलिस दलासाठी ते ऑलिंपिक मानले जाते. विजय चौधरी यांचा उपांत्य फेरीत गतविजेत्या जेसी साहोटाशी यांचा सामना होता. अटीतटीच्या लढतीत चौधरी यांनी साहोताचा ११-०८ अशा मात केली. अंतिम सामन्यात विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर १० गुणांची आघाडी घेत ११-०१ असा एकतर्फी विजय मिळवत भारताला १२५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले.
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे. चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते.
आपल्या विजयाबद्दल बोलताना चौधरी म्हणाले, ‘‘काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद आहे.’’
महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी, परिवार, गुरु, गाव, मित्रमंडळी च्या सततच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला, असे चौधरी यांनी नमूद केले. चौधरी पुढे म्हणाले की, ‘‘मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलीस अधिकार्याला व अंमलदारांना समर्पित करतो. जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची २४ तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करतो.’’