इंग्लंडविरुद्ध मालिका कारकिर्दीचा टर्निंग पॉर्इंट

By admin | Published: January 28, 2017 12:34 AM2017-01-28T00:34:45+5:302017-01-28T00:34:45+5:30

क्रिकेटच्या वाटचालीत अनेक चढउतार येऊन गेले. कोणत्याही अडचणीला न घाबरता आत्मविश्वासाने आणि जिद्दीने सामोरे गेल्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकलो.

Turning Point of Series Series against England | इंग्लंडविरुद्ध मालिका कारकिर्दीचा टर्निंग पॉर्इंट

इंग्लंडविरुद्ध मालिका कारकिर्दीचा टर्निंग पॉर्इंट

Next

पुणे : क्रिकेटच्या वाटचालीत अनेक चढउतार येऊन गेले. कोणत्याही अडचणीला न घाबरता आत्मविश्वासाने आणि जिद्दीने सामोरे गेल्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकलो. खेळाडू म्हणून मी परिपक्वआणि परिपूर्ण झाल्यावर माझी फलंदाजी बहरत गेल्यानंतर भारतीय संघाकडून खेळण्याची मला उशिरा संधी मिळाली. या संधीचे सोने करता आल्याचा मला आनंद आणि समाधान आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका माझ्या कारकिर्दीचा टर्निंग पॉर्इंट आहे, असे भारताचा आक्रमक फलंदाज केदार जाधवने सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील मालिकावीर केदार जाधवचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित वार्तालापात तो बोलत होता. क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारा सामना कुठला, असे विचारल्यावर केदार म्हणाला, ‘इंग्लंडविरुद्धची मालिका ही कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. पुण्यात शतक झळकाविले आणि सामनावीराचा पुरस्कार मिळाला. विचार केला, की पुढील लढतींमध्ये कामगिरीत सातत्य राखले, तर मालिकावीर होऊ शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मला जास्त धावा करता आल्या नव्हत्या; मात्र या मालिकेने माझा आत्मविश्वास वाढला. या आधीच्या झिम्बाब्वे, श्रीलंका, आॅस्ट्रेलियामधील सामन्यांनी मला खूप काही शिकविले. केदारला संघातील नवीन फिनिशर म्हणून बघितले जात आहे. यापूर्वी ही भूमिका महेंद्रसिंग धोनी निभावत होता.’ याबाबत केदार म्हणाला, ‘मला कोणासारखे व्हायचे नाही. माझ्यामुळे त्यांना वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळते आहे. मी त्यांच्या दहा टक्केही कामगिरी करू शकलो, तरी माझ्यासाठी खूप आहे, असेही फिनिशरची भूमिका आव्हानात्मक असते. संघाची गणिते तुमच्यासमोर असतात. खेळपट्टीवर फलंदाजी करताना समोरचा गोलंदाज कोणत्या प्रकारचा चेंडू टाकणार आहे, हे क्षणात ओळखून त्यानुसार तुम्हाला फलंदाजी करावी लागते. खेळपट्टीवर फलंदाजीसाठी उभे असताना तुमच्याकडे फारसा वेळही नसतो. तुम्हाला एका क्षणात निर्णय घ्यायचा असतो.’
कर्णधार कोहलीबाबत केदार म्हणाला, ‘कर्णधाराचा पाठिंबा तुम्हाला मिळणे ही खूप मोठी गोष्ट असते. मी माझा नैसर्गिक खेळ करावा, यासाठी कोहलीने मला नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)
जेव्हा खेळपट्टीवर तुमच्यासमोर कोहलीसारखा फलंदाज खेळत असतो तेव्हा त्याचा खेळ बघूनच तुम्हाला आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळते. धोनी आणि कोहली या दोन्ही कर्णधारांबाबत केदार म्हणाला, ‘धोनी दबाव सहजतेने हाताळतो. त्याला आव्हानांचा सामना करायला आवडते, तेदेखील अतिशय शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने. धोनी आणि कोहली दोघांचेही स्वभाव वेगवेगळे आहेत; पण दोन्ही जागतिक दर्जाचे कर्णधार आहेत, यात कोणतीच शंका नाही. दोघांचीही संघातील सहकारी खेळाडूंना समजावून घेण्याची किंवा प्रोत्साहन देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्या दोघांमुळे संघातील खेळाडू उत्साहित असतात. ड्रेसिंग रूममध्ये एकदम खेळीमेळीचे वातावरण असते. मिळेल त्या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्न मी करीत असतो, भूतकाळात काय झाले आणि भविष्यात काय होईल, याचा मी विचार करीत नाही. मला वर्तमानात जगायला आवडते. इंग्लंडविरुद्धच्या माझ्या कामगिरीमुळे पुढील काळात किमान दोन-तीन मालिकांमध्ये तरी संधी मिळेल, अशी आशा असल्याचे सांगून फलंदाजीत सातत्य राखून धावांची भूक कायम राखायची आहे. तिन्ही प्रकारांत खेळायला आवडेल. मिळेल त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न असेल.’ यावेळी त्याने एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचे आभार मानले, धन्यवाद! कारण मी जेव्हा, जेव्हा या खेळपट्टीवर फलंदाजी केली आहे त्या-त्या वेळी माझी फलंदाजी बहरत गेली आहे आणि माझी विक्रमी खेळी होत गेली आहे, असेही केदार मिश्कीलपणे म्हणाला. माझ्या आतापर्यंतच्या कामगिरीचे श्रेय प्रामुख्याने माझ्या कुटुंबीयांना द्यायला हवे. माझे प्रेरणास्थान माझे वडीलच आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे केदार म्हणाला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Turning Point of Series Series against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.