बारा वर्षांचा युवराज भारताचा उगवता तारा
By admin | Published: March 18, 2017 12:38 AM2017-03-18T00:38:27+5:302017-03-18T06:02:52+5:30
रेसिंग या क्रीडा प्रकाराचा भारतात मर्यादित चाहता वर्ग आहे. त्यातही, मातीच्या आणि ओबडधोबड ट्रॅकवर होणाऱ्या डर्ट बाईक रेसचा चाहता वर्ग भारतात खूप कमी आहे.
- रोहित नाईक, मुंबई
मुंबई : रेसिंग या क्रीडा प्रकाराचा भारतात मर्यादित चाहता वर्ग आहे. त्यातही, मातीच्या आणि ओबडधोबड ट्रॅकवर होणाऱ्या डर्ट बाईक रेसचा चाहता वर्ग भारतात खूप कमी आहे. मात्र, याच डर्ट बाईकच्या जागतिक नकाशावर सध्या एक भारतीय तारा चमकत असून, मलेशिया येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद रेसचा तो संभाव्य विजेता मानला जात आहे. विशेष म्हणजे हा सुपरस्टार रायडर अवघा १२ वर्षांचा मऱ्हाठमोळा पुणेकर असून, त्याचे नाव युवराज कोंडे-देशमुख आहे. डर्ट बाईकचा आठवेळचा राष्ट्रीय विजेता रुस्तम पटेलच्या मार्गदर्शनाखाली युवराज प्रशिक्षण घेत आहे. शुक्रवारी तो मलेशियाला रवाना झाला.
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून बाईक चालविण्यास सुरुवात केलेल्या युवराजने भारतात डर्ट बाईकमध्ये एकहाती दबदबा निर्माण केला. देशातील जवळपास सर्वच राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या युवराजने दुबई रेसिंगमध्ये बाजी मारत ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला. तसेच, जागतिक डर्ट बाईक रेसची राजधानी असलेल्या अमेरिकेत युवराजने पुणेरी हिसका दाखविताना थेट उपविजेतेपदाला गवसणी घातली.
तरी, आगामी २४ व २५ मार्चला होणारी आशियाई शर्यत युवराजसाठी वेगळी असेल. त्याने याआधी कधीच आशियाई रायडर्सचा सामना केलेला नसल्याने ‘ही शर्यत मोठे आव्हान ठरेल. प्रत्येक प्रतिस्पर्धी माझ्यासाठी नवखा असल्याने त्यांच्याबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र, तरीही जेतेपद जिंकण्यात मी यशस्वी ठरेल,’ असे युवराजने ‘लोकमत’ला दिली.
२००९ साली एका राष्ट्रीय स्पर्धेत मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. त्यावेळी मी पहिल्यांदा युवराजला पाहिले. ती त्याची पहिलीच शर्यत होती. तो ज्या प्रकारे जम्प्स मारत होता ते पाहून मी थक्क झालो. एखाद्या कसलेल्या रायडरप्रमाणे तो ट्रॅकवर वावरत होता. त्याच्यापुढे इतर प्रतिस्पर्धी खूपच कमजोर भासले. तेव्हाच मी त्याला प्रशिक्षित करण्याचे ठरविले. आज तो डर्ट बाईक रेसमधील उगवता तारा असून, त्याची कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद असेल. - रुस्तम पटेल, युवराजचे प्रशिक्षक