त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:52 IST2024-10-03T19:50:58+5:302024-10-03T19:52:44+5:30
आपल्याहून अधिक मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंना त्वेशा हिने दिला पराभवाचा धक्का

त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईची त्वेशा आशिष जैन हिने नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत छाप पाडत ९ वर्षांखालील आणि १३ वर्षांखालील गटात रौप्य पदकाची कमाई केली. दोन वेगवेगळ्या गटांमध्ये खेळताना त्वेशाने शानदार कौशल्य दाखविताना आपल्याहून अधिक मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंना धक्का दिला.
सोलापूर येथे झालेल्या ९ वर्षांखालील राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिने आठ फेऱ्यांनंतर ७ गुणांची कमाई केली. नागपूरच्या विश्वजा देशमुखनेही ७ गुण मिळवले. मात्र, टायब्रेकमध्ये बाजी मारत तिने सुवर्ण पटकावले. त्वेशा ९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राची अव्वल खेळाडू असून देशात ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, तिच्या खात्यात १६३५ ईएलओ गुणांची नोंद आहे.
दुसरीकडे, पुण्यात झालेल्या १३ वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्वेशाने आठ फेऱ्यांनंतर ६.५ गुणांसह रौप्य जिंकले. या दोन स्पर्धांतील चमकदार कामगिरीनंतर त्वेशा आता आगामी ९ वर्षांखालील आणि १३ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. साऊथ मुंबई चेस अकॅडमीचे (एसएमसीए) प्रशिक्षक वीरेश तम्मिरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली त्वेशाने यशस्वी कामगिरी केली.