परदेशात दरवर्षी दोन शिबिरांची गरज : साक्षी
By admin | Published: December 24, 2016 01:11 AM2016-12-24T01:11:33+5:302016-12-24T01:11:33+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच २०१८च्या आशियाडमध्ये पदकांची आशा असलेली आॅलिम्पिक कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा तसेच २०१८च्या आशियाडमध्ये पदकांची आशा असलेली आॅलिम्पिक कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिने चांगल्या तयारीसाठी दरवर्षी विदेशात दोन शिबिरांच्या आयोजनाची मागणी केली आहे.
प्रो-कुस्ती लीगमध्ये दिल्ली सुल्तान्स संघाची सदस्य असलेली साक्षी म्हणाली, ‘आॅलिम्पिकपूर्वी आम्ही सराव आणि तयारीसाठी स्पेनला जाऊन आलो. तेथे एकाहून एक सरस मल्लांसोबत सराव केला. विदेशात प्रतिस्पर्धी मल्लांसोबत तयारी करताना अनेक अनुभव येतात. नवे डावपेच कळतात. त्यामुळे चांगल्या कामगिरीसाठी वर्षातून दोनदा विदेशात शिबिरांचे आयोजन करण्याची गरज आहे.’
साक्षीचे पुढील लक्ष्य जकार्ता येथे आयोजित आशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणे, तसेच गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगल्या कामगिरीसह अव्वल स्थान पटकाविणे हे आहे. राष्ट्रकुल तसेच आशियाडचे पदक हे आपले मुख्य लक्ष्य असल्याचे सांगून ती म्हणाली, ‘दोन महिन्यांपासून सरावास सुरुवात केली. आतापर्यंत कामगिरी चांगलीच होत आहे. मी ५८ किलो वजनी गटात कुठलाच बदल केलेला नाही.’ (वृत्तसंस्था)