टी-२० विश्वचषकात आणखी दोन संघ हवेत : रिचर्डसन
By admin | Published: April 5, 2016 12:35 AM2016-04-05T00:35:48+5:302016-04-05T00:35:48+5:30
टी-२० विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे सांगून आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी या स्पर्धेत भविष्यात आणखी किमान दोन संघांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे सांगून आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी या स्पर्धेत भविष्यात आणखी किमान दोन संघांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.
टी-२० हा शानदार प्रकार असून या प्रकारात आणखी संघ जोडण्यास तसेच पहिल्या फेरीपासूनच प्रत्येक गटात किमान एक नवीन संघ टाकण्याची संधी आहे. पाच संघांच्या ग्रुपमध्ये दोन सामने गमावले तरी स्पर्धेत कायम राहण्याची संधी असेल. चार संघांच्या गटात दोन सामने गमावल्यास बाहेर पडावे लागते. स्पर्धेत सुपर १०ऐवजी सुपर १२ राऊंड झाल्यास सामन्यांची संख्या आणि रोमांचकता वाढेल, असे मत रिचर्डसन यांनी व्यक्त केले. सुपर टेन फेरी विश्वचषकाचा भाग असून, याच फेरीत अन्य संघांविरुद्ध खेळल्यानंतर असोसिएट संघ गटातील सामन्यांसाठी पात्र ठरतात. यामुळे संघ वाढल्यास असोसिएट देशांची संधी वाढेल. असोसिएट देशांना आयसीसी वेळोवेळी विश्व क्रिकेट लीग, इंटरकॉन्टिनेन्टल कप यासारख्या स्पर्धा खेळण्यासाठी मानधन देते. टी-२० क्रिकेटचा आॅलिम्पिक समावेशाबाबत ते म्हणाले, ‘‘२०२४च्या आॅलिम्पिकमध्ये हे शक्य आहे. याबाबत अंतिम निर्णय आयसीसी बैठकीत घेऊ.’’ टी-२० वर अधिक भर दिल्यास अन्य प्रकारांचे नुकसान होईल. तिन्ही प्रकारांत संतुलन राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळेच ४ वर्षांत एक पुरुष टी-२० विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)