यू मुंबाने केली ‘पँथर्स’ची शिकार

By admin | Published: February 29, 2016 02:38 AM2016-02-29T02:38:50+5:302016-02-29T02:38:50+5:30

गतविजेत्या यू मुंबाने आपला धडाकेबाज खेळ करताना ‘जखमी’ जयपूर पिंक पँथर्सचा ३५-२१ असा फडशा पाडताना घरच्या मैदानावर विजयी सलामी देत उपांत्य फेरी निश्चित केली.

U. Mumba did the 'Panthers' hunting | यू मुंबाने केली ‘पँथर्स’ची शिकार

यू मुंबाने केली ‘पँथर्स’ची शिकार

Next

रोहित नाईक,  मुंबई
गतविजेत्या यू मुंबाने आपला धडाकेबाज खेळ करताना ‘जखमी’ जयपूर पिंक पँथर्सचा ३५-२१ असा फडशा पाडताना घरच्या मैदानावर विजयी सलामी देत उपांत्य फेरी निश्चित केली. विशेष म्हणजे, मुंबईकरांनी या वेळी सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डीची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला.
वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या या एकतर्फी सामन्यात पहिला गुण जयपूरने मिळवला; मात्र यानंतर यजमान मुंबईने त्यांना पुढील गुण मिळवण्यासाठी थेट १७व्या मिनिटापर्यंत वाट पाहायला लावली. तोपर्यंत मुंबईकरांनी जयपूरवर २ लोण चढवून २०-१ अशी भक्कम आघाडी घेतली होती. यानंतर जयपूरच्या अनिल पाटीलने एकाच चढाईत २ बळी घेत संघाला गुण मिळवून दिला. मध्यंतराला मुंबईने २१-५ अशी एकतर्फी आघाडी घेत सामना स्पष्ट केला.
यानंतर जयपूरने थोडीफार झुंज देताना मुंबईवर पहिला लोण चढवून १३-२८ अशी पिछाडी कमी केली. मात्र, पुन्हा एकदा मुंबईच्या आक्रमक पवित्र्यापुढे त्यांच्यांवर प्रचंड दबाव आला. ३३व्या मिनिटाला जयपूरवर तिसरा लोण चढवत मुंबईकरांनी अखेरपर्यंत दबदबा राखला. या शानदार विजयासह स्पर्धेच्या सुरुवातीला जयपूरकडून झालेल्या पराभवाचा वचपाही मुंबईकरांनी काढला. रिशांक देवाडिगा, कर्णधार अनुप कुमार व अनुभवी राकेश कुमार या त्रिकुटाच्या तुफानी चढायांपुढे पँथर्सने सपशेल नांगी टाकली. जयपूरकडून अनिल पाटील व राजेश नरवाल यांची झुंज अपयशी ठरली.
यानंतर अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात स्पर्धेतील आव्हन कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या तेलगू टायटन्सने निर्णायक बाजी मारताना पटना पायरेट्सचे आव्हान अवघ्या एका गुणाने ४२-४१ असे परतावले. कर्णधार राहुल चौधरीने एकहाती संघाला विजय मिळवून देताना १४ गुण मिळवले, तर प्रदीप नरवालने अप्रतिम चढाई करताना २४ गुण मिळवल्यानंतरही पटनाला अखेरच्या क्षणी पराभव पत्करावा लागला.
मुख्य खेळाडूंच्या दुखापतींनी बेजार असलेले पँथर्स आपल्या अखेरच्या सामन्यातही जखमी झाले. मोहम्मद माघसौदलौऊ व कर्णधार रण सिंग दोघांनाही या वेळी मैदान सोडावे लागले. १०व्या मिनिटाला मोहम्मद चढाई करताना जखमी झाला, तर १३व्या मिनिटाला अनुप कुमारची पकड करताना रोहित राणाला दुखापत झाली. राणाला स्टे्रचरवरून बाहेर नेण्यात आले. दोघांवरही उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली.
घरच्या प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा उत्साह देणार ठरला. सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठल्याचा आनंद असून, आमच्या संघामध्ये ती क्षमता आहे. शिवाय, आमच्या खेळाडूंनी नेहमी स्वत:ला मैदानात सिद्ध केले आहे.
- अनुप कुमार, यू मुंबा कर्णधार

Web Title: U. Mumba did the 'Panthers' hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.