यू मुंबाची ‘बुल्स’ला जोरदार धडक

By admin | Published: February 26, 2016 03:57 AM2016-02-26T03:57:41+5:302016-02-26T03:57:41+5:30

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या गतविजेत्या यू मुंबाने विजयी घोडदौड कायम ठेवताना बंगळुरू बुल्सचा ३९-१८ असा धुव्वा उडवला. सलग सहावा विजय मिळवताना यू मुंबाने गुणतक्त्यात

U Mumby's 'Bulls' hit a lot | यू मुंबाची ‘बुल्स’ला जोरदार धडक

यू मुंबाची ‘बुल्स’ला जोरदार धडक

Next

- रोहित नाईक,  नवी दिल्ली
तुफान फॉर्ममध्ये असलेल्या गतविजेत्या यू मुंबाने विजयी घोडदौड कायम ठेवताना बंगळुरू बुल्सचा ३९-१८ असा धुव्वा उडवला. सलग सहावा विजय मिळवताना यू मुंबाने गुणतक्त्यात ४० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेऊन उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली.
त्यागराज क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या एकतर्फी सामन्यात मुंबईकरांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. मुंबईकर बंगळुरूच्या खेळाडूंना सहज मारून गुणसंख्या सहज वाढवत असताना, दुसरीकडे बंगळुरूचे खेळाडू मोठ्या परिश्रमाने मुंबईच्या खेळाडूंना बाद करत होते. मात्र मुंबईकरांचा धडाका इतका जबरदस्त होता, की बाद झालेला खेळाडू पुढच्याच चढाईमध्ये परतत होता. यामुळे मुंबईची अघाडी झपाट्याने वाढली, तर बंगळुरू प्रचंड दबावाखाली आले.
बंगळुरूवर लोण चढवून मुंबईकरांनी मध्यंतराला १६-५ अशी आघाडी घेऊन चित्र स्पष्ट केले. यानंतर यू मुंबाने आणखी २ लोण चढवून बंगळुरूला प्रतिकाराची एकही संधी दिली नाही. विशेष म्हणजे विजय स्पष्ट दिसत असताना मुंबईकरांनी आपल्या राखीव खेळाडूंनाही संधी दिली. पुन्हा एकदा कर्णधार अनुप कुमार व रिशांक देवाडिगा यांचे आक्रमण आणि मोहित चिल्लरच्या दमदार पकडी मुंबईच्या विजयात निर्णायक ठरले. बंगळुरूकडून पवन कुमार एकाकी लढला.
अन्य सामन्यांत बलाढ्य पटना पायरेट्सने विक्रमी विजय मिळवताना यजमान दबंग दिल्लीला ६७-३४ असे लोळवून स्पर्धा इतिहासात सर्वाधिक गुणांची नोंद केली. याआधी २०१४मध्ये तेलगू टायटन्सने पुणेरी पलटणला ६०-२४ असे नमवले होते. पटनाने मध्यंतराला ३८-१७ असे वर्चस्व राखले. सामन्यात तब्बल ५ लोण चढवताना पटनाने एकहाती दबदबा राखला. कर्णधार रोहित कुमार व संदीप नरवालने संघाच्या विजयात निर्णयाक कामगिरी केली. दिल्लीकडून कर्णधार काशिलिंग आडके व सुरजित सिंग यांची झुंज अपयशी ठरली.

यू मुंबा सध्या सुपरडुपर फास्ट झाली असून, हाच वेग आम्हाला कायम ठेवायचा आहे. गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी पटना पायरेट्सची हार आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मुंबईत होणाऱ्या प्रत्येक सामन्यात आम्हाला विजय मिळवावा लागेल.
- अनुप कुमार,
कर्णधार : यू मुंबा

Web Title: U Mumby's 'Bulls' hit a lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.