अल्टिमेट पिकलबॉल; श्रध्दा-जोआन यांचे सुवर्ण थोडक्यात हुकले, १६ वर्षांखालील गटात सिंग बंधूंची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 09:38 PM2023-09-30T21:38:30+5:302023-09-30T21:38:44+5:30
अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रध्दा दामनी-जोआन फर्नांडिस यांना अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इंटरमेडिएट महिला दुहेरी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क - मुंबई : अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रध्दा दामनी-जोआन फर्नांडिस यांना अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इंटरमेडिएट महिला दुहेरी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, १६ वर्षांखालील मुलांच्या अत्यंत रोमांचक दुहेरी अंतिम सामन्यात आदित्य-अर्जुन या सिंग बंधूंनी दिमाखात सुवर्ण जिंकले.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने आणि प्रो वर्ल्ड टॅलेंट स्पोर्ट्सच्या वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेसाठी 'लोकमत' माध्यम प्रायोजक आहे. नवोदित खेळाडूंसाठी असलेल्या इंटरमेडिएट गटाच्या महिला दुहेरीत श्रध्दा-जोआन यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली. अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रध्दा-जोआन यांना राजश्री सोमानी-मोनिका मेनन यांच्याविरुध्द अवघ्या एका गुणाने १०-११ असा पराभव पत्करावा लागला. याआधी श्रध्दा-जोआन यांनी रूपाली सिंघल-खुशाली शुक्ला यांचा ११-० असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली होती.
१६ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्याने रविवारचा दिवस गाजवला. आदित्य-अर्जुन या भावंडांनी श्वास रोखून धरायला लावलेल्या सामन्यात १७-१५ अशी बाजी मारताना स्तव्य भसिन-मयांक धरमपुरिया यांच्या हातातून सुवर्ण पदक अक्षरशः खेचून आणले. एकवेळ स्तव्य-मयांक १३-९ अशा भक्कम स्थितीत होते. परंतु, आदित्य-अर्जुन यांनी जबरदस्त पुनरागमन करत अखेरच्या क्षणी सुवर्णपदकावर कब्जा केला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सुवर्ण पदक जिंकलेल्या स्नेहल पाटीलला महिला खुल्या दुहेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. स्नेहल-वृषाली ठाकरे यांना अंतिम सामन्यात नईमी मेहता-इशा लखानी यांनी १५-५ असे नमवले.