अखेर उपविजेतेपद ...
By admin | Published: February 15, 2016 03:28 AM2016-02-15T03:28:58+5:302016-02-15T03:28:58+5:30
संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली
१९ वर्षांखालील विश्वचषक : विंडीजविरुद्ध भारताचा धक्कादायक पराभव
मीरपूर : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या बलाढ्य भारतीय संघावर अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे अखेर १९ वर्षांखालील विश्वचषक गमवावा लागल्याची नामुष्की ओढावली. वेस्ट इंडीजने टिच्चून मारा करताना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला केवळ १४५ धावांत गारद केले. यानंतर आवश्यक धाव ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच युवा विश्वचषकावर शिक्कामोर्तब केले.
शेर-ए -बांगला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. सकाळच्या गोलंदाजीला पोषक वातावरणाचा फायदा घेत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी अचूक मारा करताना भारताचा डाव १४५ धावांत संपुष्टात आणून अर्धी लढाई जिंकली. भारताकडून सरफराजने एकाकी झुंज देताना संयमी ५१ धावांची खेळी केली. अलझारी जोसेफ आणि रायन जॉन यांनी भेदक मारा करताना प्रत्येकी ३ बळी घेत भारतीयांना रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.
यानंतर धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची आघाडीची फळीही ढेपाळली. भारतीयांनी सहजा सहजी हार न पत्करता सामना अखेरच्या षटकांपर्यंत नेला; मात्र ३ चेंडू शिल्लक राखून विंडीजने बाजी मारली. मयांक डागरने ३ बळी घेत विंडीजला जखडवून ठेवले, तर अवेश खान व खलील अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडीजने आपला अर्धा संघ ७७ धावांवर गमावला होता. यावेळी सामना भारतीयांच्या हातात होता. मात्र, केसी कर्टी (१२५ चेंडंूत नाबाद ५२) आणि किमो पॉल (६८ चेंडंूत नाबाद ४०) यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची निर्णयाक भागीदारी करून भारतीयांच्या हातातील विजेतेपद हिसकावून घेतले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताचे सर्वच प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ॠषभ पंत, कर्णधार इशान किशन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि अरमान जाफर हे सर्वच प्रमुख फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले; मात्र सर्फराझने एकाकी झुंज देताना ८९ चेंडंूत ५ चौकार व एका षटकारासह ५१ धावांची खेळी केली. महिपाल लोमरोर (१९) आणि राहुल बाथम (२१) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळे भारताला शंभरी पार करता आली.
संक्षिप्त धावफलक :
भारत : ५० षटकांत सर्वबाद १४५ धावा (सरफराझ खान ५१, राहुल बाथम २१; रायन जॉन ३/३८; अलझारी जोसेफ ३/३९) पराभूत वि. वेस्ट इंडीज (केसी कर्टी नाबाद ५२, किमो पॉल नाबाद ४०; मयांक डागर ३/२५)