उमेशची कामगिरी युवा पिढीला प्रेरित करणारी
By admin | Published: March 28, 2017 01:26 AM2017-03-28T01:26:07+5:302017-03-28T01:26:07+5:30
कसोटी मालिका अखेरच्या टप्प्यात असून, उभय संघ तुल्यबळ खेळ करीत असल्याचे चित्र दिसले. सोमवारच्या तिसऱ्या सत्रात
कसोटी मालिका अखेरच्या टप्प्यात असून, उभय संघ तुल्यबळ खेळ करीत असल्याचे चित्र दिसले. सोमवारच्या तिसऱ्या सत्रात आॅस्ट्रेलियाने मात्र मालिका गमावली असल्याचे जवळजवळ निश्चित झाले. मालिका निर्णायक वळणावर असताना सुरुवातीला भारताच्या तळाच्या फलंदाजांनी आणि त्यानंतर गोलंदाजांनी (काही वेळा खेळाडूंची भूमिका बदलत असते.) सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.
स्टीव्ह स्मिथच्या अपवादात्मक अपयशामुळे आॅस्ट्रेलियाचा डाव ५४व्या षटकांत संपुष्टात आला. भारताच्या वेगवान व फिरकी गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मालिकेच्या शेवटी वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा छाप सोडली.
उमेश यादवने या मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याची या मालिकेतील कामगिरी युवा पिढीला वेगवान गोलंदाज होण्यासाठी प्रेरित करणारी आहे. रेनशॉला टाकलेले दोन बाऊन्सर भेदक होते. भारतीय वेगवान गोलंदाजांबाबत यापूर्वी हे चित्र बघायला मिळणे विरळाच होते. संघाला बळीची गरज असताना उमेश नेहमी मदतीला धावला. उमेशची गेल्या दोन महिन्यांतील कामगिरी अभिमानास्पद आहे.
या मालिकेत जडेजा कसोटीपटू म्हणून विकसित झाला. त्याने भारताला आवश्यक असलेल्या धावा फटकावून दिल्या. भारताला केवळ ३२ धावांची आघाडी घेता आली असली तरी, ती मिळवून देण्यात जडेजाची फलंदाजी महत्त्वाची ठरली. त्यानंतर त्याने गोलंदाजीमध्येही आपले योगदान दिले.
प्रदीर्घ मोसमामुळे रविचंद्रन अश्विन थकला असला, तरी त्याने शेवट मात्र चांगला केला. त्याने या लढतीत बळी घेणारा मुख्य गोलंदाज म्हणून भूमिका बजावली नसली तरी, गोलंदाजांच्या समूहाचा महत्त्वाचा भाग म्हणून छाप सोडली.
अंतर्मन ढवळून टाकणाऱ्या या भावनिक मालिकेमध्ये उभय संघांकडून पुन्हा एकदा तुल्यबळ कामगिरी अनुभवाला मिळाली. या लढतीत काही आश्चर्य घडविण्यासाठी आॅस्ट्रेलियन खेळाडूंना स्वत:वर विश्वास ठेवून आक्रमक खेळ करावा लागेल, तर संयमी खेळी करीत भारताला मालिका विजयाचा मार्ग सुकर करण्याची संधी आहे. भारतीय संघ यशस्वी ठरल्यास त्यांना प्रदीर्घ काळ या मालिका विजयाच्या स्मृती जपता येतील. निर्णायक वळणावर असलेल्या मालिकेचा समारोप करण्यासाठी निसर्गाच्या कुशीतील धरमशाला येथील स्टेडियमच्या निमित्ताने चांगले व्यासपीठ मिळाले आहे. आता मालिकेच्या अखेरच्या दिवसाबाबत उत्सुकता आहे. (पीएमजी)