‘चिली’साठी पंचांचा निर्णय ठरला गोड
By admin | Published: June 12, 2016 06:15 AM2016-06-12T06:15:48+5:302016-06-12T06:15:48+5:30
आर्टुरो विडालने इंज्युरी टाईममध्ये वादग्रस्त पेनल्टीवर केलेल्या गोलच्या बळावर चिलीने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिविया संघावर २-१ने मात करून आव्हान
फॉक्सबोरो, अमेरिका : आर्टुरो विडालने इंज्युरी टाईममध्ये वादग्रस्त पेनल्टीवर केलेल्या गोलच्या बळावर चिलीने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिविया संघावर २-१ने मात करून आव्हान कायम ठेवले. दुसऱ्या सामन्यांत अर्र्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने हॅट््ट्रिक नोंदवीत पनामाचा
५-०ने धुव्वा उडवित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बायर्न याने अतिरिक्त वेळेत १०व्या मिनिटाला पेनल्टीवर केलेला गोल वादग्रस्त ठरला. बोलिवियाच्या संरक्षण फळीतील लुई गुटिरेज याच्या खांद्याला लागलेला चेंडू अमेरिकन पंच जेयर फारूम यांनी हॅण्डबॉल ठरविला. त्यावर बोलिवियाच्या खेळाडूंनी आक्षेप घेतला. मात्र, पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या पेनल्टीवर चिलीने गोल करून विजयासह अंतिम आठ संघांत स्थान मिळविण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.
गुटिरेज याने चुकूनही हॅण्डबॉल होऊ नये, यासाठी आपला हात पाठीमागे घेतला होता. एलेक्सिस सांचेज याने मारलेला चेंडू त्याच्या खांद्याला लागला असल्याचे नंतर स्पष्ट झाले. चिलीसाठी विडाल यानेच ४६व्या मिनिटाला गोल केला होता. तर, बोलिविया संघाकडून ६१व्या मिनिटाला कॅम्पोसने एकमात्र गोल केला. ‘ड’ गटात अर्जेंटिनाने पहिल्या सामन्यात चिलीला पराभूत केले होते.
दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीने आपल्या जादुई खेळाच्या बळावर पनामा संघाचा
५-०ने धुव्वा उडविला. मेस्सी ६१व्या मिनिटाला आगस्टो फर्नांडिसच्या जागी खेळायला उतरला. तेव्हा अर्जेंटिना १-०ने पुढे होते. निकोलस ओटामंडी याने ७व्या मिनिटास संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर मेस्सीने (६८, ७८ व ८७ मि.) गोल करून संघाची आघाडी वाढविली. सर्गियो एग्युएरोने ९०व्या मिनिटास पाचवा गोल करून सहज विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)
मेस्सीचा जलवा कायम
पाठदुखीच्या आजारानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरत असलेल्या लियोनेल मेस्सीने जोरदार पुनरागमन केले. तो ६१व्या मिनिटाला मैदानात उतरला, तेव्हा अर्जेंटिनाकडे केवळ १-० अशी आघाडी होती. तसेच आघाडीचा गोलही सामन्याच्या सातव्या मिनिटास झाला होता. त्यानंतर ६८व्या मिनिटास त्याने पहिला वैयक्तिक गोल केला. त्यानंतर ७८व्या मिनिटाला पेनल्टीवर अचूक गोल करून दुसरा गोल केला, तर ८७व्या मिनिटाला तिसरा गोल करून संघाला भक्कम आघाडीवर नेले. पनामाच्या बचावफळीस सहज भेदून त्याने संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.