अनुभवी धोनीचे न ऐकणे विराटला पडले महागात..!
By admin | Published: January 23, 2017 09:21 AM2017-01-23T09:21:34+5:302017-01-23T11:40:05+5:30
गोलंदाज बुमराहचा चेंडू मॉर्गनच्या पॅडला चाटून गेला आणि सर्वांनी पंचांकडे बादचे अपील केले. धोनी नाही म्हणत असतानाही कोहलीने रीव्ह्यूची मागणी केली आणि तो तोंडघशी पडला.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 - तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव करत इंग्लंड संघाने मालिकेत शेवटचा सामना जिंकला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 321 धावा केल्या पण भारताला ५० षटकांत ३१६ धावाच करता आल्याने हा सामना गमवावा लागला. केदार जाधवच्या ९० धावांच्या खेळीमुळे हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा ठरला.
विशेष म्हणजे नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीकडून या सामन्यात एक चूक झाली आणि नेटीझन्सनी त्याला चांगलेच धारेवर धरले.
झालं असं की, गोलंदाज बुमराह टाकत असलेल्या 29 व्या षटकातील एक चेंडू इंग्लंडच्या मॉर्गनच्या पॅडला चाटून गेला आणि बुमराहसह मैदानावरील सर्वच भारतीय खेळाडूंनी पंचाकडे बादचे अपील केले. मात्र पंच कुमार धर्मसेनानी यांनी मॉर्गनला नाबाद ठरवले. त्यानंतर कर्णधार कोहलीने धोनीकडे पाहिले आणि पंचाच्या या निर्णयावर लगेच रीव्ह्यूची मागणी केली. अनुभवी धोनीने त्याला तसे करण्यापासून रोखले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रिव्ह्यूनंतर तिसऱ्या पंचानीदेखील मुख्य पंचाचा निर्णय कायम ठेवत मॉर्गनला नाबाद घोषित केले. यामुळे कोहलीला धक्का बसला आणि धोनीचे न ऐकल्याबद्दल नेटीझन्सनीही कोहलीचा चांगलाच समाचार घेतला.
कॅप्टन कूल अशी ख्याती असलेल्या धोनीने नुकताच वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि विराट कोहली कॅप्टनशीप सोपवण्यात आली. असे असले तरी कधीकधी धोनीला आपण कॅप्टन नसल्याचा विसर पडतो आणि तो कोहलीच्या आधीच एखादा निर्णय घेतो.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यातही हे दिसून आले होते. पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने विराट कोहलीच्या आधीच रिव्ह्यूचे अपील केले होते, पण विशेष म्हणजे कोहलीनेही खिलाडू वृत्ती दर्शवत आपल्या सीनियरच्या निर्णयाचा मान राखत पाठोपाठ अपील केले होते.
मात्र कालच्या सामन्यात कोहलीने धोनीचे न ऐकता रिव्ह्यू घेतला आणि तो तोंडघशी पडला. अतिशय धमाकेदार खेळाडू असलेला कोहली वन-डे कॅप्टनशीपमध्ये अद्याप नवखा असल्याचे आणि धोनी अजूनही 'बाप' असल्याचेच कालच्या सामन्यात सिद्ध झाले. धोनीने आत्तापर्यंत घेतलेले रिव्ह्यूचे 90 टक्के निर्णय अचूक ठरले आहेत.
Virat decided to take the DRS before listening to Dhoni who was saying no and it was NOT OUT #INDvENG#INDvsENGpic.twitter.com/YtgQVUAdUm
— Sai Kishore (@DivingSlip) 22 January 2017