अविस्मरणीय विजय
By admin | Published: February 23, 2015 01:14 AM2015-02-23T01:14:02+5:302015-02-23T01:18:51+5:30
ऐतिहासिक मेलबोर्न मैदान भव्यदिव्य आहे, पण रविवारी चर्चा होती ती येथे उपस्थित प्रेक्षकांच्या गर्दीची. एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले हे
ऐतिहासिक मेलबोर्न मैदान भव्यदिव्य आहे, पण रविवारी चर्चा होती ती येथे उपस्थित प्रेक्षकांच्या गर्दीची. एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले हे स्टेडियम भारत-दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीच्यावेळी ‘हाऊसफुल्ल’ होते. मैदानावर उपस्थित प्रेक्षकांच्या जल्लोषाचे वर्णन करणे कठीण आहे. मैदानावर उपस्थित भारतीय चाहत्यांबाबत काय सांगणार? शिखर धवन ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवित होता त्यावेळी ही लढत मेलबोर्नमध्ये नसून भारतातील एखाद्या मैदानावर होत असल्याचा अनुभव येत होता. जगप्रसिद्ध मेक्सिकन वेव्हचाही येथे अनुभव आला. प्रेक्षकांच्या गर्दीला सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत पण एमसीजी व्यवस्थापनाने हे अग्निदिव्य सहज पार पाडले.
स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापासून ते एस्केलेटरपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना देण्यात आलेल्या सुविधा अव्वल दर्जाच्या होत्या. भारताचा डाव आटोपल्यानंतर महान लेगस्पिनर अनिल कुंबळेचा आयसीसी हॉल आॅफ फेममध्ये समावेश करण्याचा सोहळा पार पडला. स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण होता. यजमान आॅस्ट्रेलियाचा या लढतीत समावेश नव्हता, तरी
अनेक आॅस्ट्रेलियन चाहते लढतीचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते.