दुर्दैव... 'बजरंगा'ची कमाल, पण विराटची झाली धमाल; कुस्तीपेक्षा क्रिकेटलाच झुकतं माप
By स्वदेश घाणेकर | Published: September 21, 2018 04:55 PM2018-09-21T16:55:10+5:302018-09-21T16:58:36+5:30
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे...
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. खेलरत्न विराट कोहली वगळता. त्याला कारणच तस आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड ( ऑलिम्पिक पदकविजेते) हे देशात क्रीडा क्रांती घडवू पाहात आहेत. त्यासाठी त्यांनी ' Khelo India' या गोड नावाची संकल्पना आणली.. खेळाडूंच्या प्रत्येक पदकाचे कौतुक समारंभ केले. आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंना एका समारंभात बोलावून त्यांना ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहण्यास सांगितले... परंतु काल जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर जरा शंका उपस्थित करण्यास भाग पाडले..
२०१८ च्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आपल्याला मिळावा असे प्रत्येकाला वाटते आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रचंड मेहनत घेतो. त्यामुळे या पुरस्कारासाठी ही दोन नाव जाहीर झाल्यावर कोणीतरी दुखी होणं साहजिकच होते. तसे झालेही... राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया नाराज झाला आणि त्याने त्वरित न्यायालयात जाण्याची भाषा केली..
त्याने मीराबाई किंवा विराट यापैकी कोणावरही आक्षेप नोंदवला नाही, परंतु यंदाचा पुरस्कार हा त्याला मिळायला हवा होता.. ही भावना खरी आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ही कामगिरी या पदकासाठीच्या नियमानुसार पुरेशी आहे. पण या देशात अजूनही क्रिकेटला महत्त्व आहे आणि विराटला मिळालेला हा पुरस्कार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे..
राष्ट्रीय खेल पुरस्कार के लिए चयनित सभी खिलाड़ियो को बधाई।@BajrangPunia के अंतराष्ट्रीय स्तर पर 6 gold,4 silver,3 bronze जिनमे से 2 medal world championship के है।सभी की अपनी सोच हो सकती है पर एक खिलाड़ी और एक गुरु के रूप में मुझे लगता है की बजरंग #KhelRatna का प्रबलतम दावेदार है
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) September 18, 2018
ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल, विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद अशा चार वर्षांतून एकदा घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला हा पुरस्कार प्राधान्याने मिळायला हवा. मग विराटने यापैकी कोणते पुरस्कार जिंकले?? चला ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट नाही असे ग्राह्य धरूया.. या व्यतिरिक्त विराट कोणत्या कामगिरीच्या जोरावर खेलरत्न साठी पात्र ठरला? त्याने भारताला कोणती ऐतिहासिक स्पर्धी जिंकून दिली? जरा विचार करा आणि खर सांगा, की विराट कोहली या 'ब्रँड'समोर बजरंग पुनियाचे उल्लेखनीय कर्तृत्व खुजे ठरले का?