Union Budget 2019: ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 01:28 AM2019-07-06T01:28:28+5:302019-07-06T01:28:48+5:30
खेलो इंडिया स्पर्धेचे बजेटही ५५०.६० कोटी रुपयांवरून ६०१ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले.
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रीडा बजेट जाहीर करताना ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली. तसेच खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा शैक्षणिक महामंडळाची (एनएसईबी) स्थापना करण्याची घोषणाही केली. सीतारामन यांनी सर्वसाधारण बजेट सादर करताना यंदा फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटमधील तरतुदींमध्ये बदल केला नाही.
अर्थमंत्री सीतारामन यांनी २०१९-२० वर्षाचे बजेट सादर करताना सांगितले की, ‘आॅक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया योजनेद्वारे संपूर्ण देशात विविध स्वरूपात क्रीडा जागरूकता रुजली आहे. त्यामुळेच खेलो इंडियाचे स्वरूप वाढविण्यासाठी व सर्व प्रकारच्या आर्थिक सहकार्यासह सरकार तत्पर असेल.’
दरम्यान, क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये २१४.२ कोटी रुपयांची वाढ केली होती. मागच्या वर्षाच्या २००२.७२ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा क्रीडा क्षेत्राचे बजेट २२१६.९२ कोटी रुपये असे वाढविण्यात आले होते. खेलो इंडिया स्पर्धेचे बजेटही ५५०.६० कोटी रुपयांवरून ६०१ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले.