गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 11:04 PM2018-09-22T23:04:06+5:302018-09-22T23:04:43+5:30

आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा डोळ्यापुढे असल्याने गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीकडे समस्त गोमंतकीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होेते. अखेर ही निवडणूक शनिवारी शांततेत पार पडली.

Union Minister Shripad Naik as President of Goa Olympic Association | गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

Next

पणजी : आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा डोळ्यापुढे असल्याने गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीकडे समस्त गोमंतकीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होेते. अखेर ही निवडणूक शनिवारी शांततेत पार पडली. संघटनेच्या अध्यक्षपदी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची तर खजिनदारपदी परेश कामत यांची बिनविरोध निवड झाली होती. केवळ महासचिवपदी चुरस रंगणार अशी अपेक्षा होती. मात्र, गुरुदत्त भक्ता यांनी एकतर्फी बाजी मारली. 

भक्ता यांनी संदीप हेबळे यांचा ४१-८ अशा मतांनी पराभव केला. निवडणुकीवर नाईक पॅनेलचा दबदबा राहिला. २०१८-२०२२ या कालावधीसाठी निवडलेली १६ सदस्यीय नवी टीम नव्या दमाने क्रीडा विकासासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच आम्ही आॅलिम्पिक भवन उभारण्याचा संकल्प केला आहे, असे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले. 

या निवडणुकीसाठी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष गोविंदराज आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचे महेश रिवणकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. ही निवडणूक अ‍ॅड. गौरंग पाणंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एकूण २७ संघटनांच्या सदस्यांनी मतदान केले. २ संघटनेचे सदस्य अनुपस्थित होते. त्यात सायकलिंग असोसिएशन आॅफ गोवा आणि वेटलिफ्टिंग संघटनेचा समावेश आहे. 

निवडणुकीनंतर भक्ता म्हणाले की, मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. संघटनांच्या विविध सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आगामी ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पाहता नव्या टीमवर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी भविष्यात विविध योजना आखण्यात येतील. समितीमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अनुभवी आणि युवा सदस्यांचा या समितीत समावेश आहे. नवे चेहरे सुद्धा आहेत. त्यामुळे एक उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ज्या संघांची निवड केली जाईल. त्यात अत्यंत पारदर्शकता राखण्यात येईल. दर्जेदार खेळाडूंची निवड होईल, याबाबत काळजी घेतल्या जाईल. त्यासाठी विशेष समिती निवडली जाईल. तसेच येत्या २७ सप्टेंबर रोजी सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेण्यात येईल.   

समित्यांचे कर्णधार...
निवडणुकीनंतर नव्या समितीची बैठक झाली. या बैठकीत संघटनेची ध्येये स्पष्ट करण्यात आली. त्यात विविध समित्या तयार करण्यात आल्या. आॅलिम्पिक भवन बांधण्याचा संकल्प घेण्यात आला. याची जबाबदारी जयेश नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली. ते या समितीचे अध्यक्ष असतील. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संघ निवडीचे निरीक्षक म्हणून आश्विन तोंबट यांची निवड करण्यात आली. ड्रेस व किट्स समितीचे अध्यक्ष म्हणून सुनील मोरजकर आणि गोवा आॅलिम्पिक संघटनेचे संकेतस्थळ व व्हाट्सअप ग्रुपची जबाबदारी राजेंद्र गुदिन्हो यांच्याकडे सोपविण्यात आली. 

अशी मिळाली मते... 
अध्यक्ष-श्रीपाद नाईक (बिनविरोध), खजिनदार-परेश कामत (बिनविरोध), उपाध्यक्ष (४ पदे, नामांकन ५) - गिरीश चोडणकर ४५, इर्विन सुआरिस ४१, लेनी डी गामा ४३, राजू मंगेशकर ४३, संदीप हेबळे १६. महासचिव (१ पद, नामांकन २)- गुरुदत्त भक्ता ४१, संदीप हेबळे ८, संयुक्त सचिव (१ पद, नामांकन २)-अनघा वर्लीकर ३७, चेतन कवळेकर १०. कार्यकारी सदस्य ५ पदे-फॅरेल फुर्तादो ४७, जयेश नाईक ४२, रुपेश महात्मे ४४, सिद्धेश्वर नाईक ४०, सिद्धार्थ सातर्डेकर ३९, वेल्विन १८. 

खजिनदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याचा आनंद आहे. परंतु, माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा सचिव म्हणून मी कार्यरत आहे.हा अनुभव मला फायदेशीर ठरेल. बँकेत नोकरीला असल्याने मला बँकिंग व्यवहराचे ज्ञान आहे. खजिनदार म्हणून काम करताना त्याचाही लाभ होईल. खेळाडू असल्याने खेळाडूंच्या समस्या आणि अडचणींची मलाजाण आहे. या दोन्हींंच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे.  - परेश कामत, खजिनदार (गोवा आॅलिम्पिक संघटना).

Web Title: Union Minister Shripad Naik as President of Goa Olympic Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा